धुळे : दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या प्रकरणाला गंभीरतेने हाताळत एका आरोपीला अनोखी पण समाजोपयोगी अशी शिक्षा देण्यात आली आहे. पाच झाडे लावणे आणि सामुदायिक सेवा करणे अशी ही शिक्षा आहे. शिंदखेडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एच. एस. आदमाने यांनी न्यायदंडाधिकारी श्रीमती एच. एस. आदमाने यांनी आज हा निकाल दिला.

न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे परिसरात कायद्याबाबत जागरुकतेची भावना निर्माण झाली आहे. दारू पिऊन नागरिकांना विनाकारण त्रास देणे किंवा वाद घालणे हा क्षम्य गुन्हा नसल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विरेंद्र मोतीलाल केवट (वय २० वर्षे, राहणार सोनवर्षा, तहसील मझौली, जिल्हा सिधी, मध्यप्रदेश) याने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता नरडाणा येथे दुर्गामाता मंदिराजवळ कोणतेही कारण नसताना एकाशी वाद घातला आणि त्याला त्रास दिला. केवट हा दारूच्या नशेत असल्याने त्याच्या वर्तनामुळे सार्वजनिक शांतता भंग झाली. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदवला गेला आणि खटला पुढील सुनावणीसाठी शिंदखेडा न्यायालयात दाखल झाला.

न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपीस भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५५ अंतर्गत लावलेला दोषारोप आणि त्यातील तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावर विरेंद्र केवट याने आपली चूक मान्य करत “होय, मला गुन्हा कबूल आहे” असे स्पष्ट उत्तर दिले. त्याने स्वेच्छेने कबुली देत भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याचे आश्वासनही न्यायालयाला दिले तसेच, कमीत कमी दंडावर सुटका करण्याची विनंतीही त्याने नोंदवली. न्यायालयाने शिक्षा अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले असतानाही विरेंद्र केवट याने शिक्षा स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यानंतर दिलेल्या आदेशात श्रीमती आदमाने यांनी आरोपी विरेंद्र मोतीलाल केवट यास भारतीय न्याय संहिता कलम ३५५ अंतर्गत दोषी ठरवले.

मात्र नेहमीप्रमाणे दंड किंवा तुरुंगवास न देता, समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक अशी अनोखी शिक्षा देत त्यास नरडाणा पोलिस ठाणे हद्दीत पाच झाडे लावण्याचे आणि सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले. अशी शिक्षा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २७५ नुसार देण्याची तरतूद असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. केवट याने ही शिक्षा पूर्ण न केल्यास त्यास एक दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

या निर्णयामुळे शिंदखेडा परिसरात न्यायालयीन आदेशांची नवी दृष्टी पाहायला मिळाली आहे. दारूच्या नशेत गैरवर्तन करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा लोकांना विनाकारण त्रास देणे यावर कठोर कारवाई होऊ शकते, हा ठोस संदेश न्यायालयाने दिला आहे. कबुली दिली तरी जबाबदारी टाळता येत नाही आणि कायदा मोडल्यास योग्य शिक्षा होते, हे या प्रकरणातून स्पष्ट दिसून येते.

नवीन फौजदारी कायद्यानुसार अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद पहिल्यांदाच या कायद्यात (बीएनएसएस)  करण्यात आली आहे. ही एक ट्रायल केस धुळे पोलिसांनी घेतली व कम्युनिटी सर्व्हिसअंतर्गत दोषसिद्धी मिळवण्यात यश आले. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)