जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांसह घरांचे तसेच पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजून सुरूच आहेत, तितक्यात शनिवारी रात्री पुन्हा बऱ्याच तालुक्यांना जोरदार पावसाने तडाखा दिला. नदी व नाल्यांना मोठे पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटला. शिल्लक राहिलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कपाशी, केळी, कांदा, सोयाबीन, मका, भाजापाला व फळपिकांचे सुमारे ८० हजार हेक्टरचे नुकसान होऊन ५१८ गावांमधील एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले. पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात पाचोरा तालुक्यात तिघांचा, भुसावळ व मुक्ताईनगर प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता. १९२२ पशुधन मृत्युमुखी पडले असून, १०६८ घरांची पडझड झाली. याशिवाय, ६८७ घरांत पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ५९२, एरंडोल तालुक्यात ८० आणि मुक्ताईनगर तालुक्यात १५ घरांचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाकडून पिकांसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शनिवारी सायंकाळनंतर रविवारी सकाळपर्यंत चाललेल्या पावसाने पुन्हा तडाखा दिला.
जोरदार पावसानंतर बऱ्याच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. डोंगरी, गडद, तितूर, अग्नावती, हिवरा, अंजनी नद्यांची पाणी पातळी वाढल्याने चाळीसगाव शहरातील काही भागांमध्ये कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत होते. डोंगरी नदीच्या काठावरील झोपडपट्टी व घरांमधील नागरिकांना प्रशासनाने तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही केली. तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने विविध भागांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत प्रशासनाने देखील नदी काठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. दरम्यान, तितूर नदीला पूर आल्याने कजगाव-नागद रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहु लागल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतांमधील गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या चिंतेने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. अग्नावती नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने नगरदेवळ्यातही हाहाकार उडाला. घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना मोठे नुकसान सोसावे लागले.
गिरणा, हतनूरच्या विसर्गात वाढ
पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गिरणा तसेच तापीवरील हतनूर प्रकल्पाच्या पाणी पातळीतही रविवारी मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने हतनूरचे आठ दरवाजे दीड मीटरने उघडल्याने ३२ हजार ६६६ क्सूसेकने विसर्ग सुरू झाला. गिरणा प्रकल्पाचे बरेच दरवाजे दुपारी १२ वाजता उघडण्यात आल्याने २९ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू झाला.