जळगाव : जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाले असले, तरी अतिवृष्टीसह वादळी वारा आणि पुराच्या पाण्यामुळे सुमारे १० हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीवर त्यामुळे पाणी फिरले असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके जमिनदोस्त झाल्याने अनेकांसमोर आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असताना नेमकी पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके नाजूक स्थितीत पोहोचली होती. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीसह किटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली होती. पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला होता. दमदार पावसाअभावी नदी-नाले वाहून निघाले नसताना, विहिरींसह कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झाली नव्हती. पाण्याची कोणतीच सोय नसलेल्या शेतकऱ्यांवर आभाळाकडे पाहण्याची वेळ आली होती.
सुदैवाने महिनाभराच्या खंडानंतर शुक्रवारी रात्री आणि त्यांनतर जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी नद्यांसह नाल्यांच्या काठावरील तसेच सखल भागातील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान त्यामुळे झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात १५ आणि १६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसह वादळी वारे आणि पुराच्या पाण्यामुळे २०८ गावांमधील सुमारे १३ हजार २१७ शेतकरी बाधित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे १० हजार १९६ हेक्टरवरील कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, केळी, ऊस आणि भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यापैकी मक्याचे सर्वाधिक ४२८४ हेक्टर, कपाशीचे ३८८४ हेक्टर, सोयाबीनचे ८३८ हेक्टर, केळीचे १०८ हेक्टर, ज्वारी-बाजरीचे ७६ हेक्टर आणि इतर फळ पिकांचे ७६ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव दौऱ्यावर असताना, अतिवृष्टीसह इतर कारणांनी नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहेत. प्रत्यक्षात पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने महसूल व कृषी विभागाला पिकांचे पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतरच नुकसानीच्या पंचनाम्यांना गती मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.