नाशिक – हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित महिला हॉटेल मालकाशी हितसंबंध जोपासत बड्या सावजांना जाळ्यात अडकवत होती, मागील काही वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याचे बोलले जाते. खंडणीच्या मागणीत परस्परविरोधी तक्रारी झाल्या. परंतु, नंतर त्या मागे घेतल्या गेल्याची चर्चा आहे. हनी ट्रॅप प्रकरणाचा राज्यात बोभाटा झाल्यामुळे शहरातील ते बहुचर्चित हॉटेल आणि त्या हॉटेल मालकाशी संबंधित पाथर्डी भागातील क्लब येथून बडी मंडळी अंतर्धान पावली आहेत.
राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर समाजमाध्यमांत यावर चर्चा रंगली आहे. अधिकृतपणे तक्रार नसल्याने हनीट्रॅपच्या जाळ्यात कोण अडकले, त्यांची नावे उघड झालेली नाहीत. यामध्ये केवळ शासकीय अधिकारी, राजकीय नेतेच नव्हे तर, वैद्यकीय वा अन्य क्षेत्रातील कुणीतरी अडकल्याचे बोलले जाते. काहींना त्याची मोठी किंमत मोजावी लागल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर विधिमंडळ सभागृहात चर्चेवेळी हॉटेल काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित असल्याचा उल्लेख झाला होता. नंतर या प्रकरणात अडकलेले मान्यवर कोण, असे फलक शहरात लागले.
या प्रकरणात प्रारंभी ठाण्यासह नाशिक शहरांचा उल्लेख झाला. नंतर जळगाव आणि अन्य शहरांची नावे जोडली गेली. एका सामाजिक कार्यकर्तीने तर, नाशिकमधील हे हॉटेल आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा संबंध काय, असा प्रश्नही उपस्थित केला. हे प्रकरण समोर येईपर्यंत संबंधित हॉटेल आणि क्लबवर भल्याभल्यांची वर्दळ असायची. कुणी खेळण्याच्या निमित्ताने तर, कुणी स्पा व तत्सम सोयी-सुविधांचा लाभ घेण्यासाठी येत असे. आता संबंधितांच्या पायाखालील वाळू घसरल्याने ते ठिकाण ओस पडल्याचे सांगितले जाते.
हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित महिलेने हॉटेल मालकाशी हितसंबंध जोपासत अल्पावधीत मोठी प्रगती साधल्याची चर्चा आहे. ही महिला मूळची नाशिकची रहिवासी असून अलीकडेच ती ठाणे येथे स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. सिडको आणि नंतर पाथर्डी फाटा येथे बराच काळ तिचे वास्तव्य होते. पाथर्डी फाटा, मुंबई नाका आणि गंगापूर रोड परिसरातील हॉटेल मालकांच्या उशिराच्या कार्यक्रमात ती कायम दिसून आल्याचे सांगितले जाते. महिलेचे पाथर्डी भागातील वास्तव्य आणि त्याच भागातील क्लब यावरही चर्चा झडत आहे.