देवळालीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत सरोज अहिरे यांनी योगेश घोलपांचा केलेला दणदणीत पराभव, कळवणमध्ये माकपच्या गडाला राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी दिलेला हादरा, इगतपुरीत शिवसेनेच्या निर्मला गावितांचा काँग्रेसच्या हिरामण खोतकरांनी केलेला पराभव, येवल्यात सलग चौथ्यांदा छगन भुजबळांनी मिळवलेला विजय तर नांदगावमध्ये सेनेच्या सुहास कांदेंनी पंकज भुजबळांची रोखलेली हॅट्ट्रिक.. जिल्ह्य़ातील निकालाचे हे वैशिष्टय़े ठरले. इगतपुरीत पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला तर देवळालीत मात्र त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
सेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांचे एकहाती वर्चस्व राष्ट्रवादीच्या तरुण उमेदवार सरोज अहिरे यांनी मोडून काढले. यापूर्वी महापालिका निवडणुकीत सरोज यांनी माजी महापौर नयना घोलप यांना पराभूत केले होते. विधानसभा निवडणुकीत सेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांना धूळ चारत त्यांनी त्याच निकालाची पुनरावृत्ती केली. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, हा चंग सरोज यांनी बांधला होता. यामुळे अखेरच्या क्षणी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन त्या राष्ट्रवादीत दाखल झाल्या. त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. आजवर अनेकदा लढत देऊनही स्पर्धेतही न राहणाऱ्या राष्ट्रवादीने सेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावला. या मतदारसंघाचे सलग पाच वेळा बबन घोलप यांनी प्रतिनिधीत्व केले होते. न्यायालयीन शिक्षेमुळे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाला. यामुळे गेल्या वेळी सेनेने घोलप यांचा मुलगा योगेशला तिकीट दिले होते. तेव्हा ते निवडून आले. परंतु, ही निवडणूक घोलप कुटुंबियांचे वर्चस्व, सेनेचा बालेकिल्ला ढासळविणारी ठरली. सरोज यांचे वडील दिवंगत बाबुलाल आहिरे यांनी १९७८ ते १९८५ या काळात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
येवल्यात पुन्हा छगन भुजबळच!
तीन वेळा येवला मतदारसंघाचे नेतृत्व करणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवत त्यांना चवथ्यांदा विधानसभेत पाठविले. ही निवडणूक भुजबळ यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी असल्याने तिला विशेष महत्व प्राप्त झाले होते. महायुतीच्या संभाजी पवारांना त्यांनी सहजपणे चितपट केले. भुजबळांविरोधात कधीकाळचे त्यांचे सहकारी एकवटले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांना दोन वर्षे कारागृहात जावे लागले. यामुळे जनसंपर्कात खंड पडला होता. विरोधकांची एकजूट, राष्ट्रवादीची खस्ता हालत ही आव्हाने असताना भुजबळांनी एकहाती विजय संपादित केला. निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मतदारसंघात आणले. रखडलेली मांजरपाडा वळण योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच दरसवाडी धरणातून हे पाणी येवल्यात पोहचले. ३० ते ३५ गावातील सिंचनास त्याचा लाभ होईल. दुष्काळी भागात पोहचलेले पाणी भुजबळांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करणारे ठरले. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांसाठी सभा घेतली होती. परंतु, त्याचाही उपयोग सेनेला झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
इगतपुरीत निर्मला गावितांना धडा
सलग दोन वेळा काँग्रेसच्या आमदार राहून तिसऱ्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या निर्मला गावित यांचा हिरामण खोसकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांने केलेला पराभव बरेच काही सांगणारा ठरला. सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या गावितांना मतदारांनी धडा शिकवला. देशात, राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहून गावितांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश करीत उमेदवारी मिळवली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या कन्या असणाऱ्या निर्मला यांच्याबद्दल मतदारसंघात कमालीची नाराजी होती. मतपेटीतून ती बाहेर पडली. एकेक जागा वाढविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सेनेला त्याचे चटके बसले. उलट खोसकर यांच्या माध्यमातून काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. खोसकरांनी ३१ हजारहून अधिकच्या मताधिक्याने गावितांना पराभूत केले.
भुजबळपुत्र पंकज यांचा पराभव
येवल्यात सलग चौथ्यांदा छगन भुजबळ हे विजयी होत असताना दुसरीकडे शेजारील नांदगाव मतदारसंघात मात्र त्यांचे पुत्र पंकज यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. शिवसेनेचे बाहुबली उमेदवार सुहास कांदे यांनी त्यांना पराभूत केले. पंकज भुजबळ यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यांची हॅट्ट्रीक कांदेंनी रोखली. या जागेवर भाजपचे बंडखोर रत्नाकर पवार हे मैदानात होते. त्याचा लाभ राष्ट्रवादीला होईल, असा एक मतप्रवाह होता. मात्र सेनेने तो फोल ठरवला. मनसे, राष्ट्रवादी आणि नंतर सेना असा प्रवास करणाऱ्या कांदे यांनी १० वर्षांपासून मतदारसंघात काम केले. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी पंकज भुजबळांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मागील निवडणुकीत ते शिवसेनेकडून मैदानात उतरले होते. परंतु, तेव्हा युती नसल्याने १९ हजार मतांनी ते पराभूत झाले होते. त्याचा वचवा या वेळी त्यांनी पंकज यांचा पराभव करून काढला.
माकपचा बुरूज ढासळला
कळवण मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे नितीन पवार यांनी आठ वेळा विधानसभेत निवडून आलेल्या माकपच्या जे. पी. गावितांना पराभूत केले. या निकालामुळे जिल्ह्य़ातील माकपचा बुरूज ढासळला. गेल्या वर्षी त्यांनी नाशिक ते मुंबई असा हजारो आदिवासींचा पायी मोर्चा काढत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. पवार यांचे वडील दिवंगत ए. टी. पवार यांनी प्रदीर्घ काळ कळवण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पुर्नरचनेत सुरगाणा आणि कळवण मतदारसंघ एकत्र झाले होते.