धुळे – धुळ्यातील देवपूरमधील सावरकर पुतळा चौकात गोळ्या झाडून सराफ व्यापाऱ्यावर दरोडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे विभागाच्या पाथकाने मोटार, बंदूक, सोने आणि धारदार साहित्यासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जुलैच्या रात्री आठ वाजता देवपूरमधील सावरकर पुतळ्याजवळ हा थरार झाला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा-धुळे बसमधून विनय जैन आणि त्याचा सहकारी कर्षण मोदी हे सावरकर पुतळा येथील थांब्यावर बसमधून उतरले. यावेळी चेहऱ्यावर काळा मुखवटा लावून आणि हेल्मेट घालून एका मोटार सायकलवर आलेल्या तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवत विनय जैन यांना घाबरविण्यासाठी हवेत गोळी झाडली.

त्यांच्याजवळील तीन किलो ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोने व्यवहाराच्या पावत्या असलेली बॅग बळजबरीने हिसकावून तिघे काही कळण्याच्या आत पसार झाले होते. याप्रकरणी विनय जैन यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपविला.

गुन्ह्यात संशयितांना ओळखणारे कोणतेही साक्षीदार नसतांना पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेवून या गुन्ह्याचे मूळ शोधले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणातून संशयित वाहनांचे क्रमांक मिळविले. या गुन्ह्यातील संशयित मुंबईकडून आल्याचे धागे पोलिसांच्या हाती लागले. मुंबईमध्ये खासगी कंपनीत टॅक्सी चालविणाऱ्या प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या व्यक्तींनी हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी प्रथम संशयितांचा मुंबई येथे शोध घेतला. संशयित मुंबईतूनही पसार झाल्याचे पोलिसांना कळाले. यानंतर प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथे पोलीस पोहोचले.

संशयितांचा शोध घेत असतांना मोहंमद शहरेयार मोहंमद इबरार खान ( २४, रा.बहरापूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम वडाळा,मुंबई) आणि दिलशान इमरान शेख (२१, रा. यहियापूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम सुंदरबाग, कुर्ला,मुंबई) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाली. या दोन्ही संशयितांविरुद्ध प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथे हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असून दोघांना अटक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून प्रतापगढ (उत्तर प्रदेश) पोलीस आणि न्यायालयाशी पत्रव्यवहार केला. यानंतर प्रतापगढ येथून दोघांनाही २३ ऑगष्ट रोजी ताब्यात घेतले.

दोन्ही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी धुळ्यात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून दोन लाख ५१ हजार ७०० रुपयांचे २६२.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोटार, गावठी बंदूक, दोन बनावट नंबरपट्ट्या आणि धारदार कटर असा ऐवज जप्त केला. अटकेतील संशयितांविरुद्ध उत्तर प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक चेतन मुंढे, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव आणि संजय पाटील,राहुल सानप,आरीफ पठाण,पवन गवळी,देवेंद्र ठाकुर,मयूर पाटील,अमोल जाधव, कैलास महाजन यांनी केली.