नाशिक – ऑक्टोबर महिन्याचा शेवट जवळ आल्याने पाऊस गेला असे वाटत असतानाच नााशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून या महिन्यातील पावसाची ही सर्वाधिक नोंद आहे.
पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीकवाया जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. भातपीक, फळबागांसह भाजीपाल्याचे पावसामुळे अधिक नुकसान होत आहे. तयार झालेल्या भात पिकाच्या लोंब्या सोंगणीनंतर गळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अजून काही दिवस हवामान विभागाने पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतीची कामे उरकण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पावसाळी हंगाम संपला असतानाही पाऊस होत आहे. त्यामुळे आता नेमके करावे तरी काय, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे.
यावर्षी शेतीला मान्सूनने चांगली साथ दिली. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये संततधार पाऊस झाल्याने तयार झालेले भातपीक शेतात साचलेल्या पाण्यामुळे कापणे शक्य झाले नाही. आता कापणीला सुरुवात झाली असताना लोंब्यांच्या वजनामुळे भाताच्या काड्या मोडण्याचे आणि लोंब्या गळण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतात पाणीच पाणी असल्याने भात सोंगणी करणार कशी, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
पावसाळ्यात मान्सूनने शेतकर्यांना दिलासा देणारी हजेरी लावली. मात्र, पीक तयार झाल्यानंतरही पाऊस होत असल्याने तयार झालेले भातपीक काही ठिकाणी आडवे झाले. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे कापणीला अडचणी निर्माण झाल्या. लोंब्याच्या वजनाने भाताची काडी मोडू लागली आहे. पावसामुळे सोंगणीस उशीर झाल्याने भाताच्या लोंब्या गळण्याचे प्रकार वाढले आहेत.
दरम्यान, माजी आमदार निर्मला गावित यांनी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील भात पिकाचे नुकसान होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये पाऊस होत असल्याने होणाऱ्या नुकसानीकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीही बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून भात पिकासाह द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी झालेल्या नुकसानीसंदर्भात लवकरच कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
