जळगाव : भुसावळ येथील रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भाडेतत्त्वावरील वाहनाच्या लॉगबुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची मागणी करुन पैसे स्वीकारताना संस्थेच्या प्राचार्यांसह लिपिकास पुणे सीबीआयच्या पथकाने अटक केली. प्राचार्य सुरेशचंद्र जैन आणि निविदा विभागाचे लिपिक योगेश देशमुख अशी अटकेतील लाचखोर संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा : नाशिक : महाआरतीसाठी गोदापात्रालगत बांधकामास विरोध

भुसावळ येथील तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) भाडेतत्त्वावर वाहने लावली आहेत. मार्चअखेरपूर्वी लावलेल्या वाहनांची देयके निघण्यासाठी तरुणाने लिपिक योगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जुन्या तारखेवरील लॉगबुकवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राचार्यांची स्वाक्षरी आणण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने पुणे सीबीआयकडे तक्रार नोंदविली. लाच पडताळणीसाठी सीबीआयचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह १७ अधिकार्‍यांच्या पथकाने संस्थेच्या प्राचार्यांच्या दालनात दुपारी सापळा रचला. तक्रारदाराने योगेश देशमुख यांना लाचेपोटी नऊ हजारांची रक्कम दिली. त्यानंतर त्यांनी प्राचार्यांच्या दालनात जात लाचेची रक्कम जैन यांच्याकडे देताच पथकाने देशमुख आणि जैन यांच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा : नाशिकमध्ये राज ठाकरे ‘भावी मुख्यमंत्री’ फलक, राजकीय पक्षांची फलकबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित दोघांची पथकाने कसून चौकशी केली. त्यानंतर प्राचार्यांच्या दालनाची झाडाझडती घेतली. रेल्वे फिल्टर हाउसजवळील डॅनियल चौकासमोरील सी-२५४ या प्राचार्यांच्या निवासस्थानासह लिपिकाच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यात पथकाच्या हाती काही लागले की नाही, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.