जळगाव : जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे. जळगाव मतदारसंघातील भाजपचे विद्यमान नाराज खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने ते उमेदवारी करण्याची चर्चा जोर धरु लागली असली तरी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचेही नाव ठाकरे गटाकडून घेतले जात आहे. भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ठाकरे गटाला अजूनही सापडलेला नाही. भाजपने जळगावला धक्कातंत्र वापरत खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने पाटील समर्थकांमध्ये नाराजी आहे.

जळगाव मतदारसंघावर ३० वर्षांपासून भाजपचा वरचष्मा आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेला आला असून, ठाकरे गटाकडून रोज नवनवीन नावे पुढे येत आहेत. ठाकरे गटाकडून नव्याने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. यापूर्वी ठाकरे गटातर्फे इच्छुकांमध्ये जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर कुलभूषण पाटील, भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील यांची नावे होती. भंगाळे यांनी उमेदवारीस नकार दिला आहे. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा : वंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

ठाकरे गटातर्फे सद्यःस्थितीत भाजपने उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, चाळीसगावचे डॉ. उत्तमराव महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमोद पाटील हेही मशाल घेऊन लढण्यास इच्छुक आहेत. खासदार पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे संजय राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. भाजपचे युवा पदाधिकारी तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : मंत्र्यांसमोर भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरेंविषयी नाराजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात कार्यकर्ते संतप्त

भाजपमधील नाराज मंडळी उमेदवारीसाठी ठाकरे गटाच्या नेत्यांशी संपर्क करीत आहेत. उमेदवार जाहीर होईपर्यंत मशाल चिन्हाचा प्रचार करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले आहे.

संजय सावंत (जळगाव जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)