जळगाव : जिल्ह्यातील पारोळा, बोदवड, अमळनेर, जामनेरसह अन्य तालुक्यांतील काही भागांत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन पिकांचे नुकसान झाले. अमळनेरला बोरी नदीला आलेल्या पुरामुळे चार गावांचा संपर्क तुटला. तसेच बोदवड तालुक्यातील लोणवाडीत अनेक घरे पाण्याखाली गेली. शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नाल्याच्या पुरात बैलजोडी, तर भिलालीचा एकजण वाहून गेला. पावसामुळे बोरी, खडकासह अनेक नदी-नाल्यांना पूर आला. मध्यम व लघु प्रकल्पही भरले.

अमळनेर तालुक्यातील बिलखडे, फापोरे खुर्द, सात्री, कन्हेरे, तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेर शहराशी संपर्क तुटला होता. तालुक्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक परिसरातील शिवल्या नाल्यास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेली. म्हसवे, जोगलखेडे, वडगाव यासह पारोळा, चोरवड, शेळावे, बहादरपूर, तामसवाडी, सार्वे, बोळे या सात मंडळांत पावसाने कपाशीची बोंडे गळून पडली.

हेही वाचा : फाॅरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष; धुळ्यात दाम्पत्यासह सात जणांविरुध्द गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंकराज-भिलाली येथील कमलाकर पाटील (५०) हे नदीत शिरलेल्या म्हशीला वाचविण्यासाठी जात असताना पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. म्हसवे, कंकराज, बोळे व पिंपळकोठा प्रकल्प पूर्णपणे भरले. पोपटनगरमध्ये वीज कोसळून सुरेश राठोड यांचा बैल जागीच मृत्युमुखी पडला. बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावात अनेक घरांत पाणी शिरले. घरांचीही पडझड झाली. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कपाशी, मका, तूर व बाजरी या पिकांना बसला. पावसाने बेटावदकडे जाणाऱ्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.