जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींनी घटस्थापनेच्या दिवशी केलेला उच्चांक दुसऱ्या दिवशी मोडीत निघाला. दोन्ही धातुंच्या दरात सकाळी बाजार उघडताच एक हजार रूपयांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली. ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली.

सोन्याच्या किमतीमध्ये होणारी वाढ ही मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असते. सध्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. वर्ष अखेरीस व्याजदरांमध्ये दोन वेळा कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्याजदर कमी झाल्यास डॉलर आणि बाँड्सची ताकद कमी होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वळतात. त्यामुळे जागतिक बाजारातील वाढ थेट भारतीय बाजारपेठेत प्रतिबिंबित होताना दिसते. याचीच प्रचिती सध्या येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या किमती वाढवणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे गुंतवणूकदार आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावर खरेदी. एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समध्ये सातत्याने गुंतवणूक होत असताना, मध्यवर्ती बँकांकडून त्यांच्या साठ्यात सोन्याची वाढ केली जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर सोने-चांदीची मागणी लक्षणीयरीत्या वाढली असून, किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

सणासुदीच्या काळात नेहमीप्रमाणे सोन्याची मागणी वाढते. मात्र, वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहक जुने दागिने बदलून नवीन नक्षीचे दागिने घेण्याला प्राधान्य देऊ शकतात. सराफांच्या मते, दर कितीही जास्त असले तरी विक्रीचे एकूण मूल्य वाढणारच आहे. जळगावमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १५ हजार ९७८ रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते.

मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १३३९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने एक लाख १७ हजार ३१७ रूपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. सुवर्ण बाजारपेठेत एक सप्टेंबरला सोन्याचे दर एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्याच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत तब्बल ८८५० रूपयांची वाढ झाली.

चांदीत १०३० रूपयांनी वाढ

शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३८ हजार २० रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३९ हजार ५० रूपयांच्या नव्या उच्चांकावर झेप घेतली. एक सप्टेंबरला एक लाख २८ हजार रूपयांपर्यंत असलेल्या चांदीच्या दरातही तीन आठवड्यात ११ हजार रूपयांहून अधिक वाढ झाली आहे.