जळगाव: शहरातील सराफ बाजारात सोमवारी १८५४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ६७३ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा १४४३ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचा दर एक लाख ११६ रुपयांपर्यंत गेला आहे. अक्षय्य तृतीयेनंतर खालावलेले सोन्याचे दर दोनच दिवसात एक लाखावर गेल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
सराफ बाजारात मंगळवारी दुपारपर्यंत १२३६ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. त्यात सायंकाळी पुन्हा २०७ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे एक लाखांवर गेले. सोन्याचे दर कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांची त्यामुळे मोठी निराशा झाली. अलीकडच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार अनुभवण्यास मिळाले आहेत. त्यानुसार, मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून, बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दागिने खरेदी करण्याची योजना आखत असलेल्या ग्राहकांना वाढत्या किंमतीचा विचारपूर्वक अंदाज घेऊन यापुढे निर्णय घ्यावा लागणार आहे. सराफ बाजारातील सोन्याचा वाढत्या दरावर गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष लागले आहे.
भारतामध्ये सोन्याच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारामागे आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती, सरकारने लादलेले आयात शुल्क आणि कर, तसेच रुपयाच्या विनिमय दरातील बदल हे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, सोने हे केवळ आर्थिक गुंतवणुकीचे साधन नसून भारतीय संस्कृतीत त्याला धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. लग्नसराई आणि विविध सण-उत्सवांच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. ज्यामुळे त्याच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदीच्या दरातही २०६० रुपये वाढ
जळगावमध्ये शनिवारी २०६० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले होते. सोमवारी दिवसभरात कोणतीही वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर स्थिरच राहिले. त्यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी दिवसभरात २०६० रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत पोहोचली.