जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संवेदनशील पुढाकारातून राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत मिशन दृष्टी, हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत आश्रम शाळांमध्ये करण्यात आलेल्या नेत्र तपासणीत सुमारे ५०० विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना चष्मे उपलब्ध झाल्याने नवी दृष्टी मिळाली आहे.
आश्रम शाळांमधील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतून येत असतात. बेताची आर्थिक स्थिती, नेत्र तपासणीची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दृष्टीदोष असलेले विद्यार्थी बराच काळ शिक्षणात मागे पडले होते. आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत या समस्येचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले; परंतु, निधी आणि संसाधनांच्या अभावामुळे सर्वांना आवश्यक मदत देण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ‘मिशन दृष्टी’ ह्या उपक्रमाची रूपरेषा ठरवली. जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने आरोग्य विभाग आणि नेत्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम शाळांमध्ये मोफत नेत्र तपासण्या आयोजित केल्या गेल्या.
प्राथमिक तपासणी नंतर दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रकारच्या चष्म्यांची निवड व परिमाण निश्चित करून ते त्यांना उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात १० विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले. चष्मे मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लक्षवेधी बदल दिसून आले. दूरच्या आणि जवळच्या भिंतीवरील बोर्डावरील अक्षरे स्पष्टपणे दिसत असल्याने पाठ वाचन, लिहिणे आणि सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग आता अधिक प्रभावी झाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. पालकांमध्येही समाधानाची भावना पसरली असून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या उपक्रमाबाबत बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या, की विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण हीच खरी गुंतवणूक आहे. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात ज्ञानाची आणि उज्ज्वल भविष्याची ज्योत कायम प्रज्वलित राहावी, ही आपली जबाबदारी आहे. हा उपक्रम केवळ आरोग्यविषयक मदत नाही तर समाजातील दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग, नेत्र तज्ज्ञ, आश्रम शाळांचे शिक्षक, स्थानिक सेवाभावी संस्था आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी एकत्रितपणे कार्य केले. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच भविष्यातील उपक्रमांसाठी स्थानिक प्रशासन व संस्थांमधील सहकार्य असेच कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
