जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल-कासोदा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची भरधाव एसटी बस शुकवारी रस्त्यालगतच्या खोलगट भागात जाऊन कोसळल्याने एका प्रौढाचा जागीच मृत्यू झाला, तर ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

एरंडोल आगाराची बस नेहमी प्रमाणे भडगाव येथून शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना घेऊन सकाळी अकराच्या सुमारास येत होती. एरंडोल शहर दोन किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्यालगतच्या खोलगट भागात जाऊन कोसळली. अचानक घडलेल्या या अपघातात गुलाब महाजन (५२, रा. वडगाव, ता. पाचोरा) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली. इतर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर एरंडोल शहरातील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.

जखमींमध्ये अहिल्याबाई पाटील, मेहमुदा मनियार, काफिया मनियार, कल्पना पाटील, शुभम पाटील, सुभाष पाटील, दिपाली पाटील, अनिता पाटील, समाधान पाटील, उत्कर्ष पाटील, ऋषिकेश पाटील, अनुसया बडगुजर, रत्नाबाई महाजन, सुनीता महाजन, वैशाली मराठे, नवशाद बी, फरिदा कुरेशी, शाहिद शेख, उन्नती पाटील, विद्या पाटील, रोशनी पाटील आदी प्रवाशांचा समावेश आहे.