जळगाव : जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी स्थानकानजीक रील बनविण्याच्या नादात दोन समवयस्क तरूणांचा धावत्या रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (१८, दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव), अशी अपघातातील मृत तरूणांची नावे आहेत. दोघेही रविवारची सुटी असल्याने पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटलगत सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे मार्गावर धोकादायक पद्धतीने रील बनविण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी नेमकी धरणगावकडून जळगावच्या दिशेने जाणारी अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आली. कानाला हेड फोन लावून रील बनविण्याच्या नादात असल्याने प्रशांत आणि हर्षवर्धन यांचे अचानक आलेल्या गाडीकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यामुळे रेल्वे जवळ आल्यानंतर दोघांना जीव वाचविण्याची कोणतीच संधी मिळाली नाही.
दोन्ही तरूणांचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दोन्ही तरूणांच्या मृत्यूनंतर पाळधी गावावर शोककळा पसरली. समाज माध्यमावर प्रसिद्ध होण्यासाठी रील बनविण्याचा नाद दोघांच्या जीवाशी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
सोशल मीडिया हे व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी माध्यम असले तरी, त्याचा वापर जबाबदारीने करणे काळाची गरज आहे. रील्स बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घालणे म्हणजे ट्रेंड नाही तर अंधानुकरणाचे द्योतक आहे. मात्र, आजची तरुण पिढी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. रील्स बनवण्याच्या स्पर्धेत अनेक तरूण-तरूणी आपला जीव धोक्यात घालत आहेत. अलीकडच्या काळात अशा रील्स बनवताना अपघात होण्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत.
