मालेगाव : अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटानंतर विविध पक्षीय नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र,अतिवृष्टी होऊन आठवडा उलटल्यावरही धुळ्यातील काँग्रेस खासदार डॉ.शोभाताई बच्छाव या आपद्ग्रस्तांना भेटण्यासाठी आल्या नव्हत्या. त्यामुळे ‘खासदार दाखवा अन् बक्षीस मिळवा’ असे आवाहन करणारा व्हिडिओ प्रसारित करून भाजपकडून डॉ.बच्छाव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. या व्हिडिओची समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली. अखेरीस सोमवारपासून डॉ बच्छाव यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केला.

परतीच्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. गेल्या २२ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील १३ पैकी ११ मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. असे असताना डॉ.बच्छाव यांनी खासदार म्हणून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही आणि शेतकऱ्यांचे दुःखही जाणून घेतले नाही, असा सूर लावणारा एक व्हिडिओ भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनील शेलार यांनी समाज माध्यमांद्वारे प्रसारित केला.

यापूर्वी धुळे लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार राहिलेले डॉ.सुभाष भामरे हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात धावून येत असत आणि वारंवार ते दौरे करत असत, अशी टिप्पणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेलार यांनी केली होती. त्यानंतर डॉ. बच्छाव यांनी तालुक्यात दोन दिवशीय पाहणी दौरा आखला. त्यामुळे भाजपने डिवचल्यानंतर बच्छाव यांना या पाहणी दौऱ्याचा मुहूर्त सापडला का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी झोडगे,करंजगव्हाण, हाताणे भागातील नुकसान झालेल्या शेत पिकांची त्यांनी पाहणी केली. मंगळवारी अजंग वडेल,दाभाडी परिसरास त्यांनी भेटी दिल्या. या गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची दुःखे त्यांनी जाणून घेतली. अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर काँग्रेसतर्फे राज्यपालांना सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ.बच्छाव यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. या पाहणी दौऱ्यात डॉ. बच्छाव यांच्या समवेत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद खैरनार,तहसिलदार विशाल सोनवणे,तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे,डॉ.दिनेश बच्छाव तसेच कृषी व महसूल विभागांचे अन्य अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते.

या दौऱ्यात नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्यात येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय उदासीनता व विमा दाव्यासाठी संबंधित विमा कंपन्यांकडून केला जाणारा विलंब यासंदर्भातील तक्रारींचा शेतकऱ्यांकडून पाऊस पडला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष घालण्यात येईल,असे आश्वासन खासदार डॉ.बच्छाव यांनी यावेळी दिले.