लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाच्या भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामातून २७ क्विंटल ५० किलो वजनाचे ५५ तांदळाचे पोते चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

नांदगाव बाजूकडील कोपऱ्यात आणि संरक्षक भिंतीनजिक असलेल्या गोदाम क्रमांक १०२ मध्ये पाच ते सहा जूनच्या रात्री ही चोरी झाली. सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर गोदामाचे शटर वाकवून चोरी झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पाच जूनला कार्यालय बंद झाल्यानंतर गोदामात असलेले एफआरके ब्रँन्डचे ५५ पोती तांदूळ (वजन अंदाजे २७ क्विंटल ५० किलो) चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याची बाजार भावाप्रमाणे किंमत रुपये १० हजार २५७ आहे.

हेही वाचा… नाशिक: आरोग्य विद्यापीठातर्फे उद्या फेरी, टपाल तिकीट प्रकाशन

अन्न महामंडळाच्या गोदामाचे संपूर्ण क्षेत्र हे प्रतिबंधित असून कोणत्याही बाहेरील व्यक्तीस आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. बऱ्याच प्रमुख ठिकाणी CCTV बसविलेले आहेत. खासगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसवावी आणि कर्मचारी नेमावे, अशी FCIची मागणी आहे. याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे खासगी सुरक्षा व्यवस्थेच्या भरवशावरच FCI डेपोची सुरक्षा व्यवस्था अवलंबून आहे. शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दक्षतेचा अभाव

ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ते १०२ क्रमांकाचे गोदाम हे नांदगाव बाजूकडे एका कोपर्यात असून तेथून संरक्षक भिंतीजवळ आहे. त्यामुळे रात्रीतून शटर फोडून ही पोती वाहून नेऊन संरक्षक भिंतीवरून बाहेर फेकण्यात आली. तेथून वाहनाने चोरून नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी चोरी झाली तेथे CCTV यंत्रणाही कार्यरत नव्हती. सुरक्षारक्षकही नसल्याची माहिती हाती आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया खंडातील अग्रगण्य मनमाड एफसीआयची सुरक्षा ही सध्या खासगी यंत्रणेकडे असून ती महामंडळाकडे देण्यात यावी व सर्व प्रमुख गोदामात सीसीटीव्ही लावण्यात यावे, ही मागणी प्रलंबित आहे. खासगी सुरक्षा व्यवस्थेविरूध्द महामंडळाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एफसीआयला स्वतःची सुरक्षा व्यवस्था नेमता येत नाही. – जगदिशसिंग मर्टोलिया (क्षेत्रीय व्यवस्थापक, एफसीआय, मनमाड)