नाशिक – मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेने नागपूर येथे भोंसला विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील डॉ. मुंजे संस्थेच्या सभागृहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर (निवृ्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी मांडला.
विद्यार्थी केंद्रभूत ठेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला साजेशा नियमित शिक्षणाबरोबर सैनिकी, क्रीडा साहसविषयक शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्व प्रकारचा सुविधा देणे यांसारख्या बाबींना प्राधान्य देत भोंसला विद्यापीठ स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. ही केवळ विद्यापीठ निर्मिती नसून एक राष्ट्रीय चळवळ आहे, जिथे शिक्षण, शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्व यांचा संगम साधला जाईल. त्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. त्यात प्रामुख्याने अरूणाचल प्रदेशातील एनडीए प्रशिक्षण, मुरूड येथील कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक कॅम्पसमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांंसाठी घेतलेल्या निर्णयांचा समावेश होता. कार्यवाह मिलिंद वैद्य यांनी नाशिक विभागात राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती सादर केली. नागपूर विभागाचे कार्यवाह राहुल दीक्षित यांनी नागपूर विभागातील भोंसला सैनिकी शाळा आणि नव्या सैनिकी शाळेबाबत माहिती दिली. कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.