नाशिक : पंचवटीतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरावर आर्थिक वादातून संशयिताने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. जखमी डॉक्टरांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमधील डॉ. कैलास राठी यांच्याकडे रोहिणी दाते-मोरे या काम करत होत्या. त्यांचे पती राजेंद्र मोरे यांचा डॉ. राठी यांच्याशी जमिनीच्या व्यवहारावरून संपर्क झाला. म्हसरूळ परिसरातील भूखंड खरेदीचा व्यवहार दोघांमध्ये झाला. या व्यवहारात ठरलेली बहुतांश रक्कम ही राठी यांनी मोरे यांना दिली. मात्र काही रक्कम बाकी असल्याने मोरे आणि राठी यांच्यात वाद होता.

दोन वर्षांपासून हा वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री याविषयी चर्चेसाठी मोरे हा राठी यांच्या कक्षात गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोरे याने राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. आरडाओरड ऐकत कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. परंतु, दालनाचा दरवाजा बंद असल्याने त्यांचा नाईलाज झाला. मोरेने दार उघडून पलायन केले. राठी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मोरेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : धुळे : विवाहासाठी मंडळी जमली अन् संकट उभे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“डॉ. राठी यांच्यावर झालेला हल्ला हा डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नसून त्यामागे वेगळे कारण आहे. त्याचा तपास सुरू आहे. डॉक्टरांची सुरक्षा महत्वाची असून या अनुषंगाने पोलिसांना काय करता येईल, ती आवश्यक खबरदारी नाशिक पोलीस घेतील. सध्या डॉ. राठी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे”, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटले आहे.