नाशिक – सण,उत्सवांना दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरुप येत असताना, त्यापासून दूर राहिलेला शेतकऱ्यांसाठी प्रिय असलेला बैलपोळा हा सणही आता व्यावसायिकतेच्या जाळ्यात अडकू लागल्याचे चित्र यावर्षी दिसले. बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांविषयी आदरभाव व्यक्त करणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांना ही बाब रुचत नसली तरी शेतकरीवर्गातीलच नवीन पिढी या आधुनिक वळणाकडे खेचली जात असल्याचे नाशिक जिल्ह्यात बैलपोळ्याच्या दिवशी घडलेल्या एका घटनेवरुन दिसत आहे.

मुंबई, ठाणे,पुणे यांसह इतर मोठ्या शहरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला कधीच व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या उत्सवांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी कोणते मंडळ किती थर लावत आहे, यापेक्षा यानिमित्त उभारण्यात आलेल्या मंचावर कोणत्या नर्तिका, अभिनेत्री आपले कलागुण सादर करणार आहेत, याकडे उपस्थितांचे अधिक लक्ष असते. शहरी भागांमधील हा प्रकार दुर्देवाने आता ग्रामीण भागातही पसरु लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड-सिन्नर महामार्गावर शिवरे हे छोटेसे गाव आहे. बैलपोळा नाशिक जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा झाला असताना दुसऱ्या दिवशी शिवरे हे गाव अचानक प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यास कारणीभूत ठरली समाज माध्यमात फिरलेली चित्रफित. शुक्रवारी बैलपोळा सणाच्या दिवशी काही जणांनी बाहेरगावाहून नर्तकींना शिवरे गावात आणले होते. बैलजोडींसमोर या नर्तकींनी नाचही केला. त्याला उपस्थितांकडून घोषणा देत प्रतिसादही मिळत होता. या नर्तकी नंतर थेट शिवरे ग्रामपंचायतीच्या छतावर नाचत असल्याचे चित्रफितीत दिसत आहे.

समाज माध्यमातील या चित्रफितीमुळे शासकीय यंत्रणा हादरली. बैलपोळ्याची मिरवणूक सोडून नर्तकी शासकीय इमारत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर गेल्याच कशा, असा प्रश्न प्रत्येकाकडून विचारला जात आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषद आणि निफाड पंचायत समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकाराचे चित्रण अनेकांनी केले असले तरी या नर्तकींना गावात आणले कोणी, याविषयी मौन बाळगले जात आहे. शिवरे येथील ग्रामविकास अधिकारी संगीता गोसावी यांनी हा प्रकार सायंकाळी उशिरानंतरचा असून चित्रफितीतूनच तो समजला असल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायत कार्यालय बंद असताना या नर्तकी छतावर कशा गेल्या, याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे. निफाड तालुक्याच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दोन दिवस सुट्टी असल्याने त्याठिकाणी नेमके काय घडले, याविषयी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामविकास अधिकारी अनभिज्ञि असल्याचे सांगितले. चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठविला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी आवाजाच्या भिंती (डीजे) चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.