नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील जागेची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकरमापक सचिन काठे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गेल्या वर्षी या विभागातील प्रभारी उपसंचालक, लिपीक, कार्यालयीन प्रतिलिपी लिपीक यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. भूमी अभिलेखच्या कुठल्याही कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे सहजपणे होत नसल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.

तक्रारदाराला अंजनेरी येथील सर्वे क्रमांक १९९-ब मधील ४० गुंठे जमिनीची मोजणी करून हद्द कायम करायची होती. या कामासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय (त्र्यंबकेश्वर वर्ग तीन) कार्यालयातील प्रभारी भूकरमापक सचिन काठे (३७) याने ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये ठरले. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याआधारे विभागाच्या पथकाने सापळा रचला. ३५ हजार रुपये स्वीकारत असताना भूकरमापक काठेला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी जबाबदारी सांभाळली.

हेही वाचा…दिवसाआड परीक्षा घेण्याविषयी आरोग्य विद्यापीठाची सहमती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाढती लाचखोरी

या कारवाईने भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या प्रारंभी भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक तथा उपसंचालक (अतिरिक्त कार्यभार) महेशकुमार शिंदे आणि कनिष्ठ लिपीक अमोल महाजन यांना ५० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीचा भूमी अभिलेख कार्यालयाने तयार केलेल्या हिसा नमुना १२ मध्ये लिखाणात झालेली चूक दुरुस्तीचा आदेश देण्यासाठी शिंदेने एक लाखाच्या लाचेची मागणी करीत त्यातील ५० हजार रुपये स्वीकारले होते. तर दुसरा संशयित महाजनने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले होते. त्यानंतर काही दिवसात शेती गट क्रमांकाची मोजणी करून त्यात पोट हिस्स्याच्या खुणा दाखविण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपीक नीलेश कापसेला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले होते. २०२३ या वर्षात भूमी अभिलेख कार्यालयात सात सापळे रचण्यात आले होते.