नाशिक : जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. ४५ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हातील विविध मतदार संघातून १०७ गुन्हेगारांना निवडणूक काळासाठी हद्दपार करण्यात आले आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना तत्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी १०७ जणांना निवडणूक कालावधीसाठी पोलीस ठाणेनिहाय मतदारसंघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हद्दपार संशयित मतदार संघात वावरतांना आढळल्यास तत्काळ अटक करुन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यान्वये आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह, समाजविघातक कृत्य करणाऱ्या संशयितांविरुध्द हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. अशा एकूण ४५ गुन्हेगारांना विशिष्ट कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहिता लागु झाल्यापासून जिल्हा अभिलेखावरील एकूण दोन हजार ८६३ गुन्हेगार, समाजकंटक, उपद्रवींविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.