नाशिक : जगभरात मोठमोठी सामाजिक स्थित्यंतरे ही त्या त्या काळातील विद्यापीठांमध्ये विचार मंथनातून घडून आलेली आहेत. सध्या पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मुक्त विद्यापीठे असे काम अधिक प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळे भविष्यात भारताची समाजरचना कशी असावी, यादृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विचारमंथन घडवून आणावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केली.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाच्या प्रथम यश जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी पद्मश्री चैत्राम पवार, प्रा. रंगनाथ पठारे, प्रकाश पाठक, अशोक कटारिया, विवेक सावंत यांच्यासह विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. काकोडकर यांनी, शिक्षणाचे उद्दिष्टे हे समस्या जाणून त्यावर उपाययोजना करणे हे हवे, असे सांगितले. स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ॲनिमियाची (रक्तक्षय) समस्या आपणास भेडसावत आहे. तसेच आगामी काळात भेडसावणाऱ्या समस्यांची यादी ही अजून वेगळी असू शकते. त्यादृष्टीने पारंपरिक शिक्षणपद्धती ही जुनाट व चैतन्यहीन झाली आहे. त्यादृष्टीने बघता आता शिक्षण आणि संशोधन हे वेगळे नसून एकमेकांना पूरक आहे, हे लक्षात घेवून ते एकत्र चालायला हवे. समस्यावरील समाधान काढण्याची क्षमता ही शिक्षणात असायला हवी.
विज्ञान तंत्रज्ञानासह मानव्यविद्या असे शिक्षण सर्वसमावेशक असायला हवे, ते जगाच्या पुढे जाण्यासाठी नव्हे तर आपल्या ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी. शहरी व ग्रामीण भागातील दरी मिटवायला हवी. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर होण्यापेक्षा शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर होणे गरजेचे आहे. विद्यापीठांनी त्या दृष्टीने विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी काकोडकर यांच्या हस्ते पद्मश्री चैत्राम पवार, प्रा. रंगनाथ पठारे, प्रकाश पाठक, अशोक कटारिया व विवेक सावंत (माहिती – तंत्रज्ञान) यांचा यश जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल, स्मृतीचिन्ह, मानपत्र, धनादेश, दिवंगत राम ताकवले स्मृतीग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.