नाशिक – पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत परस्परांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शह-काटशह देणारे महायुतीतील छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे हे दिग्गज मंत्री पुन्हा लवकरच नाशिकमध्ये एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत.

कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीच्या निमित्ताने हे मंत्री अलीकडेच अन्य एका स्पर्धक मंत्र्यासोबत मुंबईत एकत्र आले होते. कुंभमेळ्याला अतिशय कमी कालावधी आहे. या नियोजनासाठी मंत्री समितीची स्थापना होऊन महिना उलटल्यानंतर बैठकीला मुहूर्त लाभला. आता पालक मंत्रीपदाच्या स्पर्धेतील ॲड. माणिकराव कोकाटे यांचा अपवाद वगळता महाजन, भुजबळ आणि भुसे हे तीन मंत्री सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी दुपारी चार वाजता कॉलेज रोडवरील गुरूदक्षिणा सभागृहात होत आहे. या पुरस्कारांचे वितरण जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बाबतची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यापूर्वी या पुरस्कारांचे वितरण राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीयमंत्री खा. प्रफुल पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आ. जयंत पाटील आदींच्या उपस्थितीत झाले आहे.

आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद महायुतीतील सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचे केल्यामुळे सत्ता स्थापनेला बरेच महिने लोटूनही हा पेच सुटलेला नाही. सुरुवातीला पालकमंत्रीपदी महाजन यांची नियुक्ती झाली होती. मित्रपक्षांच्या विरोधामुळे त्यास स्थगिती द्यावी लागली. दरम्यानच्या काळात महाजन यांनी कुंभमेळा मंत्रीपदाची धुरा सांभाळत कामाला सुरूवात केली. जिल्ह्यात सर्वाधिक आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री माणिकराव कोकाटे व छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदावर दावा सांगितला.

गतवेळी ही जबाबदारी सांभाळणाऱ्या दादा भुसे यांच्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) अडून बसली. परंतु, महाजन यांच्या नावात खोडा घालणाऱ्या मित्रपक्षांसाठी भाजपने कुठलीही तडजोड केली नाही. कुंभमेळा नियोजनासाठी स्थानिक मंत्र्यांच्या समावेश असणाऱ्या मंत्री समितीचा तोडगा काढला गेला. परंतु, पालकमंत्रीपदाची चुरस काही कमी झालेली नाही. कुंभमेळामंत्री नात्याने महाजन यांनी नाशिकच्या प्रशासकीय यंत्रणेवर आपली पकड मजबूत केली. मित्रपक्षांमध्ये ते पालकमंत्री म्हणून सक्रिय झाल्याची भावना बळावत आहे. या घटनाक्रमात तीन स्पर्धक मंत्री पुरस्कार वितरणात एकत्र येणे ‘सुविचार’ ठरेल की नाही. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.