मालेगाव : गिरणा धरणाच्या पांझण डावा कालव्यातून दोन आवर्तने सोडण्यासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण देण्यास राज्य शासनाने गेल्या मंगळवारी मंजुरी दिली आहे. कैक वर्षांपासून कळवाडी भागातील शेतकरी या मागणीसाठी लढा देत होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे. आमदार सुहास कांदे यांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार कामी आला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर घेतला गेलेला हा निर्णय आमदार कांदे आणि पर्यायाने शिंदे गटाचा निवडणूक मार्ग प्रशस्त होण्यासाठी लाभकारक ठरेल, अशी स्पष्ट शक्यता दिसत आहे.

नांदगाव मतदार संघात समाविष्ट असलेल्या मालेगाव तालुक्यातील कळवाडी, देवघट, साकुर, नरडाणे, उंबरदे, चिंचगव्हाण व दापुरे या सात गावांना कायमस्वरूपी दोन पाणी आवर्तने देणाऱ्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण या गावांना खेटूनच आहे. २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरण आहे. त्यातील निव्वळ उपयुक्त जलसाठा १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका आहे. ए

वढ्या क्षमतेचे धरण असतानाही या गावांसाठी असलेल्या पांझण डाव्या कालव्यामधून वर्षानुवर्षे केवळ एकच आवर्तन दिले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे नाराजीची भावना होती. धरण परिसरात असलेल्या या दुष्काळी गावांना पाण्याची कायमस्वरूपी व दोन हक्काची आवर्तने देण्यात यावीत म्हणून तेथील शेतकरी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. त्यासाठी आजवर अनेकदा अर्ज,विनवण्या व आंदोलने देखील केली गेली होती. मात्र हा प्रश्न धसास लागू शकला नव्हता.

गेल्या वर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केले होते. याची दखल घेऊन आमदार सुहास कांदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून पाण्याचे दुसरे आवर्तन मिळवून दिले होते. यावेळी पाण्याचे आवर्तन आल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी कांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात जलपूजन केले होते. त्यावेळी पांझण डाव्या कालव्यातून कायमस्वरूपी दोन आवर्तने देता यावीत म्हणून शासनाकडून गिरणा धरणातील पाण्याचे आरक्षण मिळवून देऊ, अशी ग्वाही कांदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पाणी आरक्षणास मान्यता मिळाल्याने कांदे यांनी दिलेला शब्द खरा ठरला आहे.

ही मागणी पूर्णत्वास येण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता. दुष्काळी भागासाठी पाण्याची असणारी निकड व तेथील शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत महाजन यांनी पाणी आरक्षणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दोन आवर्तने या भागास उपलब्ध होणार असल्याचे कांदे यांनी नमूद केले.

गेल्या अनेक वर्षांपासून कळवाडी भागातील शेतकरी या मागणीचा पाठपुरावा करीत होते. मात्र त्याला यश येत नव्हते. आपल्या भागातील धरणाचे पाणी आपल्यालाच मिळत नाही, याबद्दल तेथील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणी आरक्षणाची ही मागणी तडीस गेली आहे. आमदार कांदे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे फळ असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. ही मागणी पूर्ण होतांना जे ‘टाइमिंग’ जुळून आले आहे, त्याचेही महत्व अधोरेखित होत असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळवाडी गटात शिवसेना शिंदे गटाला त्याचा लाभ होईल, असा रागरंग दिसत आहे.