नाशिक – सलग १५ ते २० तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागास जोरदार तडाखा दिला. एकाच दिवसांत ११७ पैकी ९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागल्याने गोदावरीसह दारणा, गिरणा, मोसम, कादवा आदी नद्यांंना पूर आला. गोदावरीचे पाणी शहराच्या नदीकाठच्या भागात शिरले. सटाणा तालुक्यात घराची भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. येवला, त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्यात अडकलेल्या २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

शनिवारी सायंकाळ ते रविवारी दुपारपर्यंत विश्रांती न घेता पाऊस कोसळला. पावसाच्या तडाख्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडली. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानला जाणारा नदीपात्रातील दुतोंड्या मारुती बुडाला. रामसेतूही पाण्याखाली गेला. काठालगतच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. नाशिक, पेठ, सुरगाणा, येवला, इगतपुरी या तालुक्यात २४ तासात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. वादळी पावसात दीडशेहून अधिक घरांची पडझड झाली. बागलाण तालुक्यातील खालचे टेंभे येथे भिंत कोसळून कस्तुराबाई अहिरे (७५) तसेच गोराणे येथे देवचंद सोनवणे (८०) आणि त्यांची सून निर्मला सोनवणे (३०) यांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले.

जिल्ह्यात पावसात ३२ पशूधन, २४८ कोंबड्यांचा मृत्यू झाला. १३५ हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. निफाड तालुक्यात सभामंडप आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडाले. काही भागात झाडांची पडझड झाली. जिल्ह्यातील धरणे आधीपासून तुडुंब भरलेली होती. मुसळधार पावसाने १८ धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. सायखेडा व चांदोरी येथील गोदावरी पात्रातील मंदिरे पाण्याखाली बुडाली. मालेगावातील गिरणा व मोसम नदी तसेच सटाण्यातील आरम नदीला पूर आला. कळवण तालुक्यात पुनद नदीला पूर आल्याने ककाणे-खेडगावचा संपर्क तुटला.

रविवारी सायंकाळी काही भागात पावसाने काहिशी उघडीप घेतली. हवामान विभागाने सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाट माथ्यावरील भागात रेड अलर्ट दिला असून अशा भागात पावसाची तीव्रता आदल्यादिवशी सारखीत राहण्याची शक्यता वर्तविली जाते. उर्वरित भागात यलो अलर्ट असून ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी काही भागात पावसाला सुरुवात झाली.

२१ जणांचे बचाव कार्य

येवला तालुक्यात अंदरसूल येथे कोळगाव नदीच्या खालील भागात राहणारे १३ जण अडकले होते. स्थानिक यंत्रणेच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर याच तालुक्यात भारम येथे अडकलेल्या दोन वयोवृद्धांचे मालेगावच्या आपदा मित्रांनी बचावकार्य केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर येथे पाण्यात अडकलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.