लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: गोदावरीवरील होळकर पुलाखालील प्रस्तावित यांत्रिकी दरवाजाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामास सुरूवात होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील सिमेंट बंधारा काढण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीत मागील भागात निर्माण होणारा फुगवटा कमी होऊन पूर पाण्याचा जलदपणे निचरा होईल. त्यामुळे गोदाकाठ परिसरात पुरामुळे कमीत कमी झळ बसण्याची व्यवस्था होणार आहे.

गोदावरी नदीकाठी स्मार्ट सिटी योजनेद्वारे सुरू असलेल्या कामांची देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले या आमदारांनी पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत मोरे उपस्थित होते. होळकर पुलाखालील यांत्रिकी दरवाजाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लागला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मोरे यांच्याकडून देण्यात आली. हा दरवाजा बसविल्यानंतर या भागातील सिमेंट बंधारा काढला जाणार आहे. या बंधाऱ्यामुळे गोदावरीच्या मागील भागात फुगवटा तयार होतो. त्याची झळ पावसाळ्यात काठालगतच्या रहिवाशांना बसते. यामुळे पूररेषा तीन मीटरने कमी होणार असल्याचे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… नाशिक: अनधिकृत नळजोडणीधारकांना अभय; जोडणी अधिकृत करण्याची मुभा; पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड

गोदा काठावर लावण्यात येणाऱ्या दगडांची पाहणी करण्यात आली. हे काम कायमस्वरुपी टिकेल या प्रकारे व्हायला हवे, अशी अपेक्षा ढिकले यांनी व्यक्त केली. कामात पाच वर्षाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी काम करणाऱ्यावर आहे. त्यामुळे दगडांचे काम अनेक वर्ष टिकेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रतीक शुक्ल यांनी दशक्रिया विधी शेडच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. या दशक्रिया विधी शेडची तत्काळ दुरुस्ती करावी, असे ढिकले यांनी सूचित केले. यावेळी शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आदी उपस्थित होते.

हेही वाचा… वेदांता, फाॅक्सकाॅनविषयी लवकरच श्वेतपत्रिकेव्दारे स्पष्टीकरण; बारसूची जागा उध्दव ठाकरे यांनीच सूचविल्याचा उदय सामंत यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त वस्त्रांतरगृहाचे नियोजन

गांधी तलावाजवळ एका अतिरिक्त वस्त्रांतरगृहाची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. प्रस्तावित वस्त्रांतरगृहाच्या इमारतीत गच्ची करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.