नाशिक : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे मांडली असल्याने कुठलाही तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे वातावरण दूषित करत नाहीत. देशात झुंडशाहीने कायदे बदलत नसल्याचे सत्य त्यांनी अधोरेखीत केले आहे. भाजपने ओबीसी आणि मराठ्यांचे मेळावे घेतले. त्यामुळे भुजबळांनी ओबीसी मेळावे घेतल्याने भांडण लागत नाही, असा सावध पवित्रा भाजपचे नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पर्यायांवर एकतर्फी कार्यवाही करत असून ओबीसींमध्ये शिक्षण, नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणात मराठा समाज वाटेकरी होणार असल्याची चिंतेची भावना असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाविषयी मांडलेली भूमिका कुणाला पटो वा न पटो, संघर्ष सुरू राहणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. या घटनाक्रमावर नाशिक दौऱ्यावर आलेल्या वनमंत्री मुनगंटीवार यांनी भाष्य केले. भुजबळ यांची विधाने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांसाठी आहेत. सर्व नेत्यांच्या भूमिका समान आहेत. कुणबी असल्याचे पुरावे असतील तर कायद्याने दाखला मिळतो. वस्तुनिष्ठ माहिती न घेता गैरसमजातून चर्चा होत आहे.

हेही वाचा…कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक का? लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले

ओबीसींमधून सरसकट आरक्षण दिले जाऊ नये, असा भुजबळांचा मुद्दा आहे. त्यांच्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भुजबळांनी जाहीर केलेल्या ओबीसी मेळाव्यांचे त्यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. भाजपने मराठा, ओबीसी समाजाचे मेळावे घेतले. मेळावे घेतल्याने भांडण लागत नाही. राजकारणात असे प्रसंग अनेकदा येतात. त्यावेळी संयम बाळगून वस्तुनिष्ठ माहिती लोकांना दिली पाहिजे, अन्यथा दुषित वातावरण निर्माण होईल. अशी कृती कुणी करू नये, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.