नाशिक : समाज माध्यमातील वादग्रस्त संदेशावरुन तीन एप्रिलच्या रात्री उपनगर पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीररित्या जमा झालेल्या हजारोंच्या जमावाकडून पाकिस्तान झिंदाबाद यासारख्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे. शहरात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात ४८ तासांत कारवाई न झाल्यास आक्रमक पवित्रा स्वीकारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जमावाविरुध्द कोणतीही कारवाई न झाल्याने फरांदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उपनगर पोलीस ठाण्याबाहेर अशा प्रकारे जमाव एकत्र करण्याचे षडयंत्र कोणी रचले, यामागे कोणत्या देशविरोधी शक्ती आहेत, याचा तपास पोलिसांकडून होण्याची आवश्यकता मांडली. समाज माध्यमातील वादग्रस्त संदेशाने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत तीन एप्रिलच्या रात्री जमाव आक्रमक झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी संकेत सौदागर याच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु, सौदागर याची कृती ही प्रतिक्रिया होती, असे फरांदे यांनी नमूद केले. जमावाने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. नाशिक-पुणे रस्त्यावरील वाहतूक कित्येक तास बंद केली. वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. जमावाने जाणीवपूर्वक पूर्वनियोजित दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक मालमत्ता व खासगी वाहनांचे नुकसान करण्यात आले, देशविरोधी घोषणाबाजी झाली, याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंधळ घालणाऱ्या जमावावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, तशी कुठलीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला. अलीकडेच सिडको परिसरात टीपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे फलक लावले गेले. गुन्हेगारी पार्श्वभूमीची व्यक्ती दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या घडामोडीतून विशिष्ट घटकाकडून निवडणुका लोकशाही मार्गाने होऊ न देण्याचा प्रयत्न होत आहे. नाशिक हे शांतताप्रिय शहर आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची गरज आहे. समाकंटकांविरुध्द कारवाई न केल्यास त्यांचे मनोधैर्य फोफावत जाईल, अशी भीतीही फरांदे यांनी व्यक्त केली.पोलिसांनी कुठलीही तमा न बाळगता बेकायदेशीर जमाव जमा करणे, सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणे, संघटित गुन्हेगारी कायदा यांच्या अंतर्गत कारवाईचा बडगा उगारावा, यासाठी पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. या गंभीर घटनेविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली जाईल, असेही फरांदे यांनी सांगितले.