नाशिक – बागलाण तालुक्यातील अंतापूर-मुल्हेर रस्त्यावर गुरुवारी रात्री मजुरांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन (पिकअप) आणि मोटार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू तर, १० ते १२ जण जखमी झाले. मयत व जखमी हे सर्व तालुक्यातील बोरदैवत आणि हनुमंतपाडा येथील असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बोरदैवत व हनुमंतपाडा येथील १५ ते २० महिला, पुरूष मजुरीसाठी खोडबेल येथे गेले होते. दिवसभराचे काम आटोपून ते पिकअपने आपल्या गावी परतत होते. तेव्हा हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या टाटा झेस्ट आणि पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नामपूर, सटाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात आशा सोनवणे (१५, बोरदैवत), शंकर आंबिस (अजंदे, सटाणा) आणि तानाजी सोनवणे (२०, हनुमंतपाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलवले. मुल्हेर व अंतापूर येथील ग्रामस्थही तातडीने मदतीला धावून आले. आयशर टेम्पोने कट मारल्याने हा अपघात झाल्याची साशंकता काहींनी व्यक्त केली. टाटा झेस्ट मोटारीतील काही जण जखमी झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
