Ganesh Visarjan 2025: नाशिक – गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमात शहरात दोन लाख २६ हजार १७७ इतक्या विक्रमी मूर्तींचे संकलन करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्ती संकलनात २० हजारहून अधिकने वाढ झाली.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने दरवर्षी गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी विभागनिहाय मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन करते. यंदा विसर्जनासाठी शहरात ३३ नैसर्गिक स्थळे तर ५३ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील दोन ठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम अशी एकत्रित विसर्जनाची व्यवस्था होती. पंचवटी विभागात फिरत्या तलावाव्दारे मूर्ती संकलनाचे नियोजन करण्यात आले होते.

पर्यावरण संवर्धनार्थ नाशिककरांनी मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्यास हातभार लावल्याचे मूर्ती संकलनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी दोन लाख पाच हजार ८५४ मूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन ही आकडेवारी दोन लाख २६ हजार १७७ वर पोहोचली.

शहरात सर्वाधिक ९० हजार २६९ मूर्ती पंचवटी विभागात संकलित करण्यात आल्या. सातपूर विभागात २२ हजार ७९२, सिडको विभागात २९ हजार ८६७, पश्चिम विभागात ११ हजार ३२८, पूर्व विभागात २१ हजार ४५ आणि नाशिकरोड विभागात ५० हजार ८७६ मूर्ती संकलित करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. या उपक्रमात मनपा पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन या विभागांनी समन्वयाने काम केले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, नेचर क्लब ऑफ नाशिक, विद्यार्थी कृती समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आदी संस्था सहभागी झाल्या. या शिवाय निसर्गायनसह काही संस्था, शाळा शाडू मातीही संकलित करीत आहेत.

विविध विसर्जन स्थळांवरून मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करण्यात आले. त्याची आकडेवारी अद्याप एकत्रित झालेली नाही. पीओपीच्या मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून महापालिकेने नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडर वितरीत केली. गतवर्षी सुमारे १७५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते. या वर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत घरीच विसर्जन केले. पर्यावरणस्नेही विसर्जनातून गोदावरीसह उपनद्यांचे जल प्रदूषण रोखण्यास हातभार लागल्याचे पहायला मिळाले.