नाशिक – सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात १० ते १२ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असताना शुक्रवारी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला.
पंचाळे परिसरात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ वर्षांचा सारंग, दीड वर्षाच्या गोलु यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे ग्रामस्थांच्या संतापाला वनविभागाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी परिसरात रास्ता रोकोही केले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नऊपेक्षा अधिक पिंजरे लावण्यासह ड्रोनच्या माध्यमातून, श्वान पथकाच्या सहाय्याने बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास चांगदेव जाधव यांच्या वस्तीवर बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्यास बेशुध्द करत त्याला ताब्यात घेण्यात आले.
नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर आणि नाशिकचे सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, प्रशांत खैरनार, निलेश कांबळे यांच्या समवेत इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, पेठ, बाऱ्हे, ननाशी, हरसुल, निफाड, संगमनेर, बोरिवली, सिन्नर आणि पेठ वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समवेत मोबाईल पथक असे १३० हून अधिक वनविभाग अधिकारी, कर्मचारी बिबट्याच्या शोध मोहिमेत गुंतले होते.
बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी आहे. त्याची शिकार कुत्रे असतात. परंतु, वाढत्या शहरीकरणात शहर आणि जंगल यामधील सीमारेषा पुसट झाल्याने बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर परिसरात काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात या वर्षात पाचहून अधिक बळी गेले आहेत.