नाशिक: शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटाच्या अंतराने तीन महिलांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर, नाशिकरोड आणि गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उपनगर येथील संगिता जाधव (५३, रा.कृष्णगौरव अपार्टमेंट,आनंदनगर) या सायंकाळी सातच्या सुमारास परिसरातील शांतीपार्क भागात आपल्या नातवास सायकलवर फिरवत असतांना ही घटना घडली. एचडीएफसी बँक परिसरात त्या नातू बसलेली सायकल लोटत असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. अनघा चव्हाण (४५, रा. शिवरामनगर, टाकळी-दसक रोड, जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली.

चव्हाण या सायंकाळी परिसरातील किराणा दुकानात जात असतांना ही घटना घडली. महापालिकेच्या घरपट्टी भरणा केंद्राजवळून त्या जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून सैलानी बाबा स्टाॅपच्या दिशेने पोबारा केला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरी घटना गंगापूररोडवरील केबीटी सर्कल भागात घडली. याबाबत रोहिणी पाटील (रा.तारवालानगर, दिंडोरीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील रविवारी रात्री नात सानवी पवार हिस बरोबर घेवून गंगापूररोडकडून दिंडोरीरोडच्या दिशेने दुचाकीने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आजी व नात दुचाकीने प्रवास करीत असतांना केबीटी सर्कल परिसरातील स्लिपवेल गॅलरीसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांनी दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून विद्याविकास सर्कलच्या दिशेने पोबारा केला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.