नाशिक : जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील ४२३ बालके ही अतितीव्र (सॅम) तर, २१७४ बालके तीव्र (मॅम) श्रेणीत असे एकूण २५९७ कुपोषित बालके आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मुंबई आयआयटीच्या सहकार्याने प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत ५९ मार्गदर्शक आणि सुविधा देणाऱ्या ३० व्यक्तींची (फॅसिलिटेटर) निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यातील ३०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. संबंधितांकडून आपल्या कार्यक्षेत्रात प्रात्यक्षिक झाले. प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी १० प्रकरणे दत्तक घेऊन त्याचा सखोल अभ्यास केला.

अंतिम परीक्षेत या प्रशिक्षणार्थींमधून ५९ मार्गदर्शक, ३० सुविधाकारक (फॅसिलीटेटेर) निवडण्यात आले आहेत. या उपक्रमात विशिष्ट पध्दतीने स्तनपान करण्यावर भर दिला गेला आहे. तसेच प्रभावी स्तनपान करताना सुरुवातीचे संकेत कसे ओळखावे, गरोदर मातेने गरोदरपणात घ्यावयाचा पोषण आहार व बाळाच्या सहा महिन्यानंतर सुरू करण्यात येणाऱ्या पूरक आहारावर भर दिला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात मदत मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी जळगावात जनसागर; गणेशोत्सवादरम्यान व्यावसायिकांनाही लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी खास भ्रमणध्वनी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचाही वापर करण्यात आला आहे. हे ॲप मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. या जोडीला सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावी स्तनपान फेरी व रुग्णाला रुग्णालयातून सोडतानाचे निकष हे उपक्रमही राबविले जात आहेत. यामुळे बाळाला जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, प्रसुती झालेल्या मातांना प्रभावी स्तनपानासाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास हातभार लागणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. दीपक लोणे आदींमार्फत हा कार्यक्रम राबविला जात आहे.