नाशिक : सातपूर येथील श्रमिकनगरात टवाळखोरांनी दहशत माजवत, वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

कडेपठार चौकात सोमनाथ नागरे आणि अरुण कोळी यांची दोन मालवाहू वाहने घरासमोरील वाहनतळात होती. मध्यरात्री टवाळखोरांनी या वाहनांच्या काचा फोडत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर सात वाजता सातपूर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. वारंवार घडणाऱ्या समाजविघातक कारवाया रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसापूर्वी याच परिसरात टवाळखोरांनी एक मालमोटार जाळण्याचा प्रयत्न केला होता.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कार्यवाही करुन अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह स्थानिकांनी केली आहे. टवाळखोरांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वेळा तक्रार करूनही गुंडांवर कारवाई केली जात नाही. मोकळे मैदान, मंदिर परिसर, अशा ठिकाणी गस्त घातली जात नाही. परिसरातील गुंड, टवाळखोर यांच्यावर सातपूर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. नागरिकांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांची दहशत आवश्यक असताना याठिकाणी परिस्थिती उलट आहे. दिनकर पाटील (माजी नगरसेवक)