धुळे – देशासह राज्यात वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जवळपास सर्वच शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात आता पोलीस दादा आणि पोलीस दीदी यांची नेमणूक करण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या आठवड्यात पोलिसांनी सर्व शाळांना भेटी दिल्या. मुलांच्या सुरक्षेविषयी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. यात प्रामुख्याने सीसीटीव्ही बसविणे, तक्रार पेटी, संरक्षण भिंत, चारित्र्य पडताळणी विषयी गांभीर्य बाळगण्याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यात आता पोलीस दादा आणि पोलीस दीदी यांची नेमणूक करुन त्यांना अशासकीय संस्थेमार्फत (एनजीओ) प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हे ही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
शाळकरी विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतूकीवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून काही ठिकाणी कारवाई केली. रिक्षाच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने शालेय विद्यार्थ्यांना बसवून त्यांची वाहतूक करतांना पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. शाळेसमोर नाहक थांबणाऱ्या टवाळखोरांनाही आता पोलिसांनी लक्ष्य केले असून शाळांच्या आसपासच्या पानटपरी, दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रतिबंध असलेले पदार्थ जप्त करून कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला. शाळेसमोर वेगाने मोटारसायकल चालविणारे आणि खास करून कणकर्कश आवाज करणाऱ्या मोटारसायकल चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भेट देऊन सुरक्षेसंदर्भात तपासणी करणार आहेत. शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी अधीक्षक धिवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात घेतलेल्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले आहे.