नजरचुकीने भारतीय सीमारेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेला ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’चा जवान चंदू चव्हाण याची काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सुटका केली होती. मायदेशी परत आल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी म्हणजेच उद्या, शनिवारी (११ मार्च) चंदू चव्हाण धुळ्यातील आपल्या गावी येणार आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे. चंदू ज्या रस्त्याने गावात येईल तिथे रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच त्याचे औक्षण करून स्वागत करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराच्या पराक्रमी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. जवानांच्या या पराक्रमामुळे लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. त्याचवेळी २९ सप्टेंबर २०१६ रोजी ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’मध्ये तैनात असलेला जवान चंदू चव्हाण नजरचुकीने भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेला होता. सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तानने चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात असल्याचे सांगितले. पाकिस्तान सरकारने खूप आढेवेढे घेतल्यानंतर अखेर २१ जानेवारी २०१६ रोजी चंदू चव्हाणची सुटका केली. त्याला भारत सरकारकडे सोपवले. तब्बल सहा महिन्यांनी चंदू चव्हाण धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी परतत आहे. पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला चंदू गावी येणार म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्ष, समाजसेवक, संघटना यांनी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.




चंदू याच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नाहीत, असे समजते. दरम्यान, चंदूच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गावच्या रस्त्यांवर रांगोळी काढण्यात येणार आहे. तर वेशीवर त्याचे औक्षण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. जल्लोष आणि जंगी स्वागताची तयारी सुरु असताना चंदूचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. महिला मंडळींनी त्याच्या आवडीच्या जेवणाचा बेत करण्याचे ठरवले आहे, असे सांगण्यात आले.