नंदुरबार – पंधरा वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर रोजी देशातील पहिल्या आधार कार्डधारक होण्याचा मान नंदुरबार जिल्ह्यातील रंजना सोनवणे यांना मिळाला होता. आधार कार्डमुळे शासकिय योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊन आपल्या जीवनात बदल होईल, ही रंजना यांची आशा फोल ठरली आहे.
आजही त्यांना मोलमजुरीच करावी लागत आहे. आधारसारख्या योजनेच्या देशातील पहिल्या लाभार्थी झाल्यानंतरही त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ योजना सुरु झाल्यानंतर नऊ महिन्यांनंतर मिळाला होता. रंजना यांची आता मुलांना तरी काही काम मिळावे, अशी माफक अपेक्षा आहे.
देशात सर्वसामान्यांशी संबंधित शासकीय कामकाजासह सर्वच योजना आधार संलग्नीत झाल्याने आधारकार्डला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २९ सप्टेंबर २०१० रोजी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील टेंभली या गावी आधार योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
यावेळी देशातील पहिल्या आधार कार्डधारक होण्याचा मान टेंभली गावच्या रहिवासी रंजना सोनवणे यांना मिळाला. त्यावेळच्या कार्यक्रमात रंजनाण यांच्याबरोबर दहा जणांना आधारकार्ड देण्यात आले होते.
या योजोमुळे जीवनात बदल होईल, हे टेंभली गावाचे स्वप्न काही काळानंतर मृगजळासारखे धुसर झाले. आधार योजना सुरु झाल्याच्या सुमारे अडीच वर्षानंतर टेंभलीतील १४० नागरिकांना आधारशी संलग्न करुन गावात पहिल्यांदा आधार द्वारे घरबसल्या वृद्धापकाळ आणि श्रावणबाळ सारख्या योजनांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी जयतुबाई प्रताप माळी या गावातील पहिल्या महिलेस आधार द्वारे लाभ मिळाला. मात्र देशातील पहिल्या आधार धारक रंजना सोनवणे या योजनेच्या लाभापासून निराधारच राहिल्या.
आजही कुडाच्या साध्या घरात गरिबीत जीवन व्यतीत करणाऱ्या रंजना सोनवणे यांच्या घराला आजही विद्युत जोडणी नाही. त्यामुळे शेजार्यांकडून वीज पुरवठा घेऊन त्यांना आपले घर प्रकाशमान करावे लागत आहे. आठ- दहा वर्षात शासनाकडून उज्वला योजनेतंर्गत गॅस जोडणी आणि बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेतून भांड्याच्या लाभाव्यतिरीक्त कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही.
त्यांच्या मुलांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले असले तरी साधन साहित्याचा अभाव आणि येणार्या हप्त्यांच्या अडचणींमुळे मुलाचे घरही अपूर्ण असल्याचे रंजना सोनवणे सांगतात.
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करुन लाडकी बहीण योजना लागु केली. या योजनेचा लाभही तब्बल नऊ महिन्यानंतर जिल्ह्याधिकारी यांच्या प्रयत्नांनी रंजना सोनवणे यांना मिळाला. आपले आयुष्य मोल मजुरी करण्यात गेले. परंतु, आता आपल्या मुलांच्या हाताला तरी काम मिळावे, अशी माफक अपेक्षा रंजना व्यक्त करतात. रंजना यांच्या अशा अवस्थेमळे देशाला सर्वप्रथम आधार देणारे टेंभली गाव आजही निराधारच राहिले आहे.