नाशिक : शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायखेडा पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ मृत युवकाच्या हातातील पिवळ्या रंगाच्या रबर पट्टीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.

सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत गंगानगर येथे देवी मंदिराजवळील गोदापात्रात एका युवकाचा शिर नसलेला मृतदेह गोणपाटात लपविलेला आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. सायखेडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा तपास समांतर पध्दतीने सुरू केला. मयताच्या हातावर गोंदलेले हितेश नाव आणि हातावरील पिवळ्या रंगाची पट्टी यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. अशी पट्टी कुठे विकली जाते, याची माहिती मिळवित असतांना युवकाचा मृत्यू हा चार ते पाच दिवस अगोदर झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.

हेही वाचा >>> गोंदिया : जळीत प्रकरणातील पत्नीचाही मृत्यू; आरोपी पतीची भंडारा कारागृहात रवानगी

स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खेरवाडी परिसरातून शरद शिंदे (३३, रा. खेरवाडी शिवार), आलिम लतीफ शेख (२०, निफाड) यांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे परभणी येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे यांच्या शेतात काम करत असल्याचे सांगितले. हितेश याला पेठ नाका परिसरातून संगमनेरे यांनी मागील महिन्यात कामासाठी बोलविले होते. तिघेही मिळून शेतात काम करत होते. सात फेब्रुवारीच्या रात्री तिघांमध्ये वाद झाला. भांडण सुरू असतांना हितेशने नाशिकहून मुले बोलवून तुमचा बेत पाहतो, अशी धमकी दिली. आलिमने रागाच्या भरात हितेशवर गजाने प्रहार केला.

हेही वाचा >>> यवतमाळ : त्याने दगा दिला, तिने विष प्राशन करून गर्भातील बाळासह जीव दिला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाव वर्मी बसल्याने हितेशचा मृत्यू झाला. शेतमालक जगदीश संगमनेरे, त्यांचे मुलगे संदिप आणि योगेशही त्या ठिकाणी पोहचले. हा प्रकार गावात समजल्यावर बदनामी होईल, शेतमजूर मिळणार नाही, या भीतीने संगमनेरे यांच्या सांगण्यावरून हितेशचा गळा कापून शीर आणि धड वेगळे करुन पोत्यात भरण्यात आले. गोणपाटात मृतदेह भरुन तो गोदावरी नदीत टाकण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी शरद शिंदे, आलिम शेख, जगदीश संगमनेरे, योगेश संगमनेरे, संदिप संगमनेरे यांना अटक केली आहे. पोलीस तपास जलद गतीने केल्याबद्दल तपासी पथकाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.