धुळे : बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात येत असल्याच्या संशयावरुन धुळे येथील साक्री रस्त्यावर असलेल्या सुमन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर सोमवारी जिल्हा वैद्यकीय विभागाच्या चौकशी पथकाने कारवाई केली. चौकशी पथकाने छापा टाकला त्यावेळी सोनोग्राफी केंद्रात दोन महिला रुग्ण आढळून आल्या.गर्भपात सुरु असताना रुग्णालयातील डॉ. सोनल वानखेडे या उपस्थित नव्हत्या. रुग्णालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांकडून कडी बंद खोलीत गर्भपात करण्यात येत असल्याचे आढळले. यावेळी केलेल्या तपासणीत रुग्णांची दैनदिन नोंदवही आणि अन्य आक्षेपार्ह कागदपत्रे औषधे पथकाच्या हाती लागले.

धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील संशयास्पद गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सोमवारी महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, अन्न औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त वर्षा महाजन, नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, जिल्हा विधी सल्लागार ॲड. मीरा माळी, सहायक पोलीस निरीक्षक वसंत गोंधळी, हवालदार मोनाली पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यासंदर्भात डॉ. संपदा कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० आठवड्यापर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास शासनमान्यता असली तरी सुमन हॉस्पिटलमध्येया बेकायदेशीरपणे गर्भपात केले जात असल्याच्या संशयावरुन अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी आढळून आलेल्या रुग्ण महिलेची विचारपूस केली असता ती याआधी सुरत येथून गर्भलिंग तपासणी करुन आली होती. सुमन हॉस्पिटलमधील डॉ. सोनल वानखेडे यांच्याकडे तिने गर्भपात करुन घेण्यासाठी सल्ला घेतला. तीन दिवसांपूर्वी डॉ. सोनल वानखेडे यांनी संबंधीत महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिल्याने ती सोमवारी रुग्णालयात आली होती. तत्पूर्वी संबंधीत महिलेला काही औषधे देण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारण साडेचार हजाराची औषधे या रुग्ण महिलेने खरेदी केल्याचे सांगण्यात आले. याचवेळी एका बंद खोलीतून एका महिलेचा आवाज आला. यामुळे संशय बळावल्याने आम्ही त्या खोलीकडे गेलो असता, ती खोली आतून बंद असल्याचे लक्षात आले. खोलीत गेल्यावर रक्ताळलेल्या अवस्थेत साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला. ही गोष्ट डॉक्टर म्हणून आपणास धक्कादायक वाटल्याचे डाॅ. संपदा कुलकर्णी यांनी सांगितले. चौकशीचा पंचनामा करुन जिल्हाधिकार्‍यांकडे तो सादर करण्यात येणार आहे. यानंतर डॉ. सोनल वानखेडे यांच्याविरुध्द तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकेल, असे डाॅ. संपदा कुलकर्णी यांनी नमूद केले. दरम्यान या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र, गर्भपात, प्रसूती रुग्णालयांमधील कारभाराची चौकशी अधिक व्यापक होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.