जालना : मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने पुनर्रचित केलेली मंत्रिमंडळ उपसमिती म्हणजे पोळ्याच्या दिवशी केलेला खांदेबदल आहे. उपस स मिती आणि आमच्या मागण्या हे वेगळे विषय आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपद आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, उपसमिती हे पूर्वीचेच खूळ असून त्यामध्ये नवीन काही नाही. दुपारी नांगरांचे बैल बदलावेत तसे हे आहे. हा झाला की तो याप्रमाणे नांगरांचे बैल बदलले जातात. आता पोळयाच्या दिवशी उपसमितीमध्ये खांदे बदलले आहेत. आमच्या मागण्याच सरकारच्या डोक्यात येत नाहीत.
मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय घ्यावा, सगेसोयरे संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत, बलीदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांच्या संदर्भात मार्ग काढावा, हैदराबाद आणि सातारा संस्थानांच्या गॅझेटचा विचार मराठा आरक्षणाच्या संदभर्भात करावा अशा आमच्या मागण्या आहेत, असे जरांगे म्हणाले. आमच्या मागण्या करा, बाकीचे कांही ऐकण्यात आम्हाला रस नाही असे सांगून जरांगे म्हणाले, मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण २९ ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहोत. मंत्रीमंडळ बैठक बोलावून आमच्या मागण्यांबद्दल सरकारने निर्णय घेतला पाहिजे. दिशाभूल करून मराठ्यांना वेड्यात काढणे थांबविले पाहिजे. लोकांना आता सगळे कळत आहे.