जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आठ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर सेवेत कार्यरत एका कर्मचाऱ्याच्या घरावर बेछुट गोळीबार केल्याची घटना घडली. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी बंदुकीतून तीन वेळा गोळ्या झाडून दगडफेकही केली. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रण देखील तपासण्यात येत आहे. घटनेत ज्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्या घराचे तसेच घराबाहेर उभ्या असलेली दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुरिअर सेवेत कार्यरत चंद्रशेखर पाटील हे पत्नीसमवेत घरात जेवण करत असताना गोळीबाराची घटना घडली.

चंद्रशेखर पाटील यांचा एक मुलगा कामावर गेला होता, तर दुसरा बाहेरगावी होता. शनिवारी रात्री साधारण साडेदहाच्या सुमारास अचानक काही दुचाकी पाटील यांच्या घरासमोर येऊन थांबल्या. त्यावरून उतरलेल्या आठ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम शिवीगाळ करत दहशत माजवली. काही क्षणांतच त्यांनी घराच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यानंतर घराबाहेर उभी असलेली पाटील यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यासारखे हल्लेखोर वागत होते. आजुबाजुचे नागरिक बाहेर पडताच हल्लेखोरांनी तीन वेळा हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात आले.

सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पाटील यांचे घर आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबारानंतरच्या दोन रिकाम्या पुंगळ्या पाटील यांच्या घराच्या समोरूनआणि एक पुंगळी त्यांच्या घरातून जप्त केली. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, पोलिसांनी सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.