जळगाव : शहरातील विमानतळावरून सद्यःस्थितीत गोवा, हैदराबाद, पुणे, मुंबईसाठी विमानसेवा सुरू आहे. या शिवाय नवी दिल्लीसह इंदूर, सुरत आणि नागपूरसाठी आता स्वतंत्र विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेही प्रवासी संख्या, आर्थिक-सामाजिक प्रगती लक्षात घेऊन नवीन उड्डाण सेवा सुरू करण्याबाबत विमानतळ संचालकांशी चर्चा केली आहे.
जळगाव शहरातील विमानतळाला राज्यातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या विमानतळाचा नुकताच मान मिळाला. विमानतळावरील सेवा अधिक कार्यक्षम आणि गतीमान करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर विमानतळाच्या विस्तारासाठी तब्बल ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
या निधीच्या मदतीने पुढील वर्षभरात विविध विकासकामे पूर्ण केली जाणार असून, त्यामुळे विमानतळाची सुविधा, सेवा आणि प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जळगाव शहराचा प्रादेशिक विकास आणि हवाई संपर्क दोन्ही अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव विमानतळावरील ॲप्रनचा विस्तार करून दोन एटीआर-७२ आणि एक लेगसी-६५० विमान एकाचवेळी पार्क करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज टर्मिनल इमारत उभारली जाणार असून, त्यात १५० प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था उपलब्ध असेल. टर्मिनल इमारतीसमोर १०० वाहनांच्या क्षमतेचा प्रशस्त पार्किंग परिसर तयार केला जाणार आहे.
तसेच आगमन सभागृहात प्रवाशांच्या सामानासाठी कन्व्हेयर बेल्ट, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काऊंटर, खाद्यपदार्थांची दुकाने आणि बालसंगोपन कक्ष यांसारख्या सोयींचीही निर्मिती केली जाणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतर जळगाव विमानतळ अधिक आधुनिक, प्रवासी-अनुकूल आणि प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित होईल.
जळगाव-मुंबई विमानसेवा आतापर्यंत आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू होती. २६ ऑक्टोबरपासून ती नियमित करण्यात आली आहे. तसेच मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा देखील पूर्वत झाली आहे. उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून सध्या गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता नवी दिल्ली, इंदूर, सुरत आणि नागपूर या मोठ्या शहरांना जळगावशी जोडण्यासाठी इंडीगो आणि स्टार एअर कंपनीने विमानसेवा सुरू करावी म्हणून लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करून सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुधारणा याबाबतची माहिती घेतली. विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
विमानतळाच्या शेजारून जाणारा उमाळे–नशिराबाद रस्ता, महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची उपलब्धता, विमानतळ हद्दीबाहेरील झाडांची समस्या, विमानतळ परिसरातील बाह्य रस्त्यांवरील खांब आणि प्रकाश योजना, प्रवासी संख्या आणि जिल्ह्यातील आर्थिक-सामाजिक प्रगती लक्षात घेऊन नवीन उड्डाण सेवा सुरू करण्याबाबत प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळाचे संचालक त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली.
जळगाव विमानतळ हे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. प्रवासी सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि विस्तारक्षम ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले.
