जळगाव – विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे रविवारी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर भुसावळसह जळगाव स्थानकावर या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांनी हजेरी लावून प्रवाशांचा उत्साह वाढवला.
भुसावळ स्थानकावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल उपस्थित होते. सर्वांनी नागपूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय, जळगाव स्थानकावर राज्यसभेचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम, लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.
नागपूर आणि पुणे ही दोन्ही शहरे वेगाने वाढणारी मोठी शहरे असून, दोन्ही ठिकाणी अनेक लघू आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. नागपूर आणि पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी या दोन्ही शहरांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना चांगला फायदा होईल. विशेष म्हणजे व्यापार आणि वाणिज्य संधी वाढतील. पर्यटनालाही चालना मिळेल, अशी आशा स्वागतासाठी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्व डबे वातानुकूल प्रणालीने सुसज्ज आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार तापमान स्वयंचलितपणे कमी-अधिक होईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी डिझाइन केलेली आसने प्रत्येक डब्यात आहेत. विशेष म्हणजे सर्व डब्यांमध्ये एलईडी प्रकाश योजना आणि स्वयंचलित पद्धतीने सरकणारे दरवाजे बसवले आहेत. त्याचप्रमाणे पॅनोरॅमिक दृश्यांसाठी मोठ्या खिडक्या, बायो-व्हॅक्यूम शौचालये, प्रत्येक डब्यामध्ये आपत्कालीन इंटरकॉम व सीसीटीव्ही प्रणाली, ड्युअल सस्पेंशन सिस्टीम आणि आधुनिक अग्नीसुरक्षा, अशी बरीच वैशिष्ट्ये नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची आहेत.
पुणे येथून सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १२.३५ वाजता जळगाव स्थानकावर पोहोचेल. तर नागपूरहून सुटलेली वंदे भारत एक्स्प्रेस जळगाव स्थानकावर दुपारी ०३.२८ वाजता येईल आणि पुणे येथे रात्री ०९.५० वाजता पोहोचेल. दोन्ही बाजुंनी प्रत्येकी सव्वासहा तासांचा वेळ जळगाव ते पुणे प्रवासासाठी लागेल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊ शकणार आहे.