जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर बाह्यवळण घेत शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाला काही दिवसांपासून गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे काम ३१ मे अखेर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले असून, बाह्यवळण महामार्ग पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद दरम्यानच्या महामार्ग बाह्यवळण रस्त्याचे काम इंदूर येथील अग्रोह इन्फ्रा कंपनीला देण्यात आले असून, एकूण १८ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यासाठी २६ महिन्यांची मुदत होती. महामार्ग जळगाव शहराबाहेरून गेल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. अपघातांचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल, अशी आशा नागरिकांना होती. प्रत्यक्षात बाह्यवळण महामार्गाचे काम नंतरच्या काळात विविध कारणांनी रखडले.

सहा वर्षांपासून सदरचे काम संथपणे सुरू होते. गिरणा नदीवर मोठा पूल तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोहमार्गांवर आणि कानळदा, ममुराबाद, असोदा, तरसोद रस्त्यांवर मोठे उड्डाणपूल मंजूर आहेत. त्यापैकी गिरणा नदीवरील ३०० मीटरच्या पुलाचे तसेच इतर ठिकाणच्या सर्वच उड्डाणपुलांचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलावर महाकाय क्रेनच्या साहाय्याने नुकतेच गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

बाह्यवळण महामार्गाच्या कामावर स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मे २०२५ पर्यंत सदरचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारासह महामार्ग विकास प्राधिकरणाला दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाह्यवळण महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीचे नियोजन गॅन्ट चार्टच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे. – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)