जळगाव : जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने बऱ्याच ठिकाणी एकमेकांशी सोयीची युती केली आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. चाळीसगावमध्येही शहर विकास आघाडीने नगराध्यक्षांसह नगरसेवक पदासाठी तुल्यबळ उमेदवार देऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
चाळीसगाव शहरात यंदा नगराध्यक्षपद खुल्या जागेसाठी आहे. अर्थातच, त्या जागी आपल्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली वाढवल्या आहे. चव्हाण उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, माझ्या घरातील कोणताच सदस्य सार्वजनिक निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केल्याचे सांगितले जाते.
प्रत्यक्षात, चाळीसगावमधील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आमदारांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अशा स्थितीत, भाजपला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीने तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याची रणनीती आखल्याने चाळीसगावात मोठी चुरस निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांच्याकडे यांनी शहर विकास आघाडीची धुरा सांभाळली आहे.
शरद पवार माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग चाळीसगावमध्ये आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीने राजीव देशमुख यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार, पद्मजा देशमुख यांनी शनिवारी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले आणि सहाय्यक निवडणूक सौरभ जोशी यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे अभिषेक देशमुख यांनीही यावेळी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला. चाळीसगावमध्ये शनिवार अखेर नगराध्यक्षपदासाठी एकमेव पद्मजा देशमुख यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवकांच्या ३६ जागांसाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. बहुधा, सोमवारी थेट नावाची घोषणा करून भाजप उमेदवारी अर्ज दाखल करेल.
जामनेरमध्ये साधना महाजन उमेदवार
भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला राखीव असताना, त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री संजय सावकारे प्रयत्नशील होते. प्रत्यक्षात, रजनी सावकारे यांनी शुक्रवारी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. जामनेरमध्येही यंदा नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव निघाले आहे. त्यामुळे त्या जागी आपल्या सौभाग्यवती साधना महाजन यांची वर्णी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. यापूर्वीही एकदा साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्या पदाचा चांगला अनुभव आहे. त्यानुसार, सोमवारी साधना महाजन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
