जळगाव – जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीसह प्रतिकूल हवामानामुळे आधीच कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात सीसीआयची खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्याने खुल्या बाजारात खासगी व्यापारी कापसाला खूपच कमी भाव देत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडले असून, दिवाळीच्या आनंदालाही आता ते पारखे झाले आहे.

दरवर्षी दिवाळीच्या आधी कापूस खरेदी केंद्रे सुरू होत असल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळत असे. मात्र, यंदा भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून १५० ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याचे जाहीर करूनही अद्याप खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातच सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. ओला दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पादन यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच शासनाकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकारणात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

देशभरात सुमारे ५५० खरेदी कापूस केंद्रे सुरू केली जाणार आहेत. आणि त्यापैकी १५० केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत होतील. साधारण १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदीला सुरू होईल, असा दावा सीसीआयचे कार्यकारी संचालक ललितकुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. प्रत्यक्षात, घोषणा करूनही कापूस खरेदी केंद्रे अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजाने साडेसहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. कापसाचा हमीभाव ८१०० रूपये असला, तरी शेतकऱ्यांना आताच क्विंटलमागे हजार ते दीड हजार रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. महाराष्ट्रात यंदा जवळपास १६ टक्क्यांनी लागवड घटल्याने ३५ लाख ४६ हजार हेक्टरवरपर्यंत कपाशीचे क्षेत्र घसरले आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात सरासरी ८० लाख कापूस गाठींचे उत्पादन दरवर्षी होत असते. सीसीआयकडून त्यापैकी जेमतेम ४० टक्केच कापसाची खरेदी केली जाते.

राज्यात यंदा लागवड कमी झाल्याने कापूस उत्पादनात घट गृहीत धरली तरी, कोणत्याही परिस्थितीत ७० लाख गाठींच्या खाली कापसाचे उत्पादन येणार नाही. परंतु, सीसीआयकडून हंगामाच्या सुरूवातीलाच कापसाची खरेदी केंद्रे सुरू करण्यात आढेवेढे घेत जात आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात खरेदी केंद्रांची संख्या २५ टक्क्यांनी वाढवली तरी सीसीआय फार तर ४० लाख कापूस गाठींची खरेदी करू शकेल. तरीही उर्वरित ३० लाख कापूस गाठींचा प्रश्न कायम असेल. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामातील कापूस अजून शिल्लक पडून आहे. त्यामुळे सीसीआय कापूस खरेदीत अपुरे पडल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.