जळगाव : जिल्ह्यातील चोपड्यात रस्ता लुटीच्या प्रयत्नातील सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी खून, दरोडा, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्व संशयितांकडून दोन गावठी बंदुका, तलवारी, मॅगझीन, भ्रमणध्वनी आणि चारचाकी, असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोपडा शहरालगत शिरपूर बाह्यवळण मार्गावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी बराच वेळ थांबून असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांना रविवारी मध्यरात्री मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून तपासासाठी रवाना केले असता, रणगाडा चौकाच्या पुढे बाजुला पांढऱ्या रंगाची चारचाकी संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. चारचारीच्या बाहेर दोघे आणि आतमध्ये पाच जण बसले होते. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस पथकाने सातही जणांच्या शिताफीने मुसक्या आवळल्या.

विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, रा. वैजापुर जि. संभाजीनगर), दिलीपसिंग हरीसिंग पवार (३२), अनिकेत बालाजी सुर्यवंशी (२५), अमनदिपसिंग अवतारसिंग राठोड (२५), सद्दामहुसेन मोहंमद अमीन (३३, सर्व रा. नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०), जयेश राजेंद्र महाजन (३०, दोन्ही रा. चोपडा, जि. जळगाव), अशी पोलिसांच्या ताब्यातील संशयितांची नावे आहेत. पैकी, दोन संशयित हे एपीडीए अंतर्गत झालेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून नुकतेच कारागृहातून बाहेर आले होते. एक संशयित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील दरोडा तसेच शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात फरार आहे. चोपडा येथील एका संशयितावर यापूर्वी अग्निशस्त्र बाळगल्यासह दंगलीचे गुन्हे नोंद आहेत. सर्व सात संशयित संगनमताने रस्ता लुट आणि दरोड्याची तयारी करून सशस्त्र स्थितीत एकत्र जमल्याचे निष्पन्न झाले. ताब्यातील चार संशयितांची नांदेड शहरात मोठी दहशत असून, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसुली करण्यासह खंडणीसाठी अपहरण, विवस्त्र करून लोकांचा छळ करण्याची कृत्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

सर्व सात संशयितांविरूध्द चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या दोन गावठी बंदुका, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चारचाकी गाडी, असा एकूण १३ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांनी यशस्वी केली.