जळगाव – जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीला १८ गावांना २२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. पावसाला पाहिजे तेवढा जोर नसल्याने टंचाई कायम असल्याच्या स्थितीत २७ जूनअखेर टँकरची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. ज्या माध्यमातून सुमारे एक लाख २१ हजार नागरिकांची तहान भागत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकरची संख्या कमी होण्याची आशा जिल्हा प्रशासन बाळगून होते. प्रत्यक्षात जून महिन्याच्या सुरूवातीला असलेल्या टँकरच्या संख्येत आणखी वाढ झाली. जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांत पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने बऱ्याच ठिकाणी नद्यांसह शेती शिवारातील नाले कोरडेठाक पडले. अनेक भागांत विहिरींसह कूपनलिकांची जल पातळी खालावली. नैसर्गिक पाणीस्रोत आटण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले.
टंचाईचा फटका जनावरांनाही बसला. पाण्याच्या वाढत्या गरजेनुसार जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली असली, तरी नव्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी वाढतच आहे. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी साठवणूक, वितरण आणि वापर व्यवस्थापनाचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
५९ खासगी विहिरींचे अधिग्रहण
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्यःस्थितीत अमळनेरमधील चार गावांना सहा, चाळीसगावमधील सहा गावांना सहा, जामनेरमधील चार गावांना पाच, पाचोऱ्यातील एका गावाला तीन, पारोळ्यातील दोन गावांना दोन, भुसावळमधील दोन गावांना दोन आणि भडगाव तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. याव्यतिरिक्त, टंचाईग्रस्त गावांसाठी ४९ तसेच टँकर भरण्यासाठी १० खासगी विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे.