जळगाव – आदिवासींसाठी दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करा, एरंडोल व चाळीसगावात प्रकल्प कार्यालयांतर्गत उपकार्यालये सुरू करा, कंत्राटी नोकरभरती तत्काळ बंद करावी, पीकविमा तत्काळ द्यावा, यांसह इतर प्रश्‍नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चाचा बिर्‍हाड मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.

लोकसंघर्ष मोर्चातर्फे गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील आदिवासी, बहुजन, शेतकरी व शहरी भागातील वस्ती- वसाहतींत राहणार्‍या सर्वसामान्यांच्या विविध प्रश्‍नांना घेऊन अध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, ताराचंद पावरा, भरत बारेला, केशव वाघ, इरफान तडवी, जया सोनवणे, कैलाश मोरे, अजय पाटील, सचिन धांडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बिर्‍हाड मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा खान्देश मिलपासून निघाला. सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रस्त्यावरच मोर्चेकर्‍यांनी ठिय्या देत शासन-प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षा शिंदे यांनी, शेतकरी, कष्टकरी, शहरातील मध्यम वर्ग, युवावर्ग, महिला हे सारे एकीकडे महागाई, बेरोजगारी व आर्थिक समस्यांमुळे त्रस्त असताना दुसरीकडे दलित, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक समाजात द्वेष व तेढ निर्माण करून लोकांना भावनिक मुद्यांमध्ये गुंतवून देश मूठभर उद्योगपतींना विकण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

जिल्ह्यात १० वर्षांत विकासाच्या दरात २.२ टक्क्यांनी घट झाली आहे. अशैक्षणिक बाबींमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे. शासकीय शाळांची दुरवस्था झाली आहे, तर दुसरीकडे प्रमाणपत्र वाटणार्‍या खासगी शिक्षण संस्थांचे पेव सुटले आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही, शासकीय धान्य खरेदी, कापूस खरेदी केंद्रे सुरू नाहीत. शेतमजुरांचे स्थलांतराचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत वाढले आहे. शहरातील तांबापुरा, सुप्रीम कॉलनी, उस्मानियाँ कॉलनी अशा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. वनजमीन कायद्याची अंमलबजावणी, शेती व शेतकर्‍यांचे प्रश्‍न, गायरान जमिनी, शहरी भागातील समस्या आदी प्रश्‍नांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तात होता.